Assembly Election : विधानसभा जागावाटपात महायुतीत होणार घमासान

Assembly Election : विधानसभा जागावाटपात महायुतीत होणार घमासान

पुणे : लोकसभा निवडणुकीआधीच पुणे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या प्रत्येक तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाचा महायुतीमध्ये समावेश झाल्यामुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या जागावाटपामध्ये मोठा पेच निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत होती. त्यावर आता लोकसभेची गणिते मांडून चर्चा होऊ लागली आहे.

आंबेगाव आणि बारामती हे दोन मतदारसंघ वगळता उर्वरित आठ मतदारसंघांमध्ये जागावाटपात मोठा संघर्ष होईल, कारण महायुतीतील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडे या प्रत्येक मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विधानसभेचे इच्छुक आहेत. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष केलेले महायुतीतील घटक पक्षांचे तगडे इच्छुक या वेळेला मोठ्या तयारीत आहेत.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्यमान आमदाराला डावलून आम्हाला पक्षनिष्ठेच्या बळावर उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे, असे होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी द्या, नाहीतर सरळ लोकसभेनंतर महायुती तोडा, असे सांगण्यापर्यंत इच्छुकांची मनस्थिती झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच राहणार नाही. त्यामुळे जागावाटपाचा पेच निर्माणच होणार नाही, असाही एक विचार राजकीय नेत्यांमध्ये आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटातही इच्छुकांची संख्या प्रचंड आहे.

आंबेगाव, बारामती, इंदापूर, खेड, मावळ या मतदारसंघांत तर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असल्याने तेथे हा गट कोणतीच तडजोड करणार नाही. सध्या तटस्थ असलेले जुन्नरचे आणि शरद पवार गटात असलेले शिरूर-हवेलीचे आमदार विधानसभा निवडणुकीपर्यंत अजित पवार गटात आल्यास हे दोन मतदारसंघही अजित पवार सोडणार नाहीत, म्हणजे हे सात मतदारसंघ अजित पवार यांना द्यावे लागणार आहेत. उर्वरित तीनपैकी दौंडला भाजपचे विद्यमान आमदार असल्याने तो वगळता भोर, पुरंदरवरही अजित पवार दावा ठोकू शकतात.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात अजित पवारांच्या फौजेचा उपयोग करून घ्यायचा आणि विधानसभेनंतर त्यांना विधानसभेला आपली जागा दाखवायची, असा निर्णय घेतलेला आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा उमेदवारीच्या वाटपावरूनही मोठे मतभेद होतील, असाही एक कयास आहे.

पुणे जिल्ह्यात विधानसभेला बारामतीमध्ये अजित पवारांच्या पसंतीच्या उमेदवार हमखास मिळणार. आंबेगाव तालुक्यातही दिलीप वळसे पाटील यांना डावलण्याची शक्यता नाही; परंतु इतर नऊ मतदारसंघांत संघात मात्र विधानसभेचे तिकीट मिळविण्यासाठी महायुतीतील प्रत्येक घटक पक्षात मोठी रस्सीखेच आहे. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मिळू शकतो.

जागावाटपात सर्वाधिक गाजणारे दोन मतदारसंघ असणार आहेत, इंदापूर आणि दौंड येथील जागावाटपावरून मोठे घमासन होणार, हे नक्की आहे. इंदापूर येथे वीस वर्षे मंत्रिपदावर राहिलेले भाजपचे बलाढ्य नेते हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये उमेदवारी मिळविण्यावरून प्रचंड चुरस होणार आहे. विद्यमान असल्याने भरणे यांची उमेदवारी निश्चित असली, तरी पाटील यांचे ज्येष्ठत्व बाजूला ठेवणे भाजपला परवडणारे नाही.

त्यामुळे भाजप या पेचातून कसा मार्ग काढणार, याची माेठी चर्चा असून, निरनिराळे 'फॉर्म्युले' सांगितले जात आहेत. दौंडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित आहेच, परंतु हे करताना अजित पवारांचे अतिशय एकनिष्ठ माजी आमदार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांचे काय करायचे, असा मोठा प्रश्न महायुतीत निर्माण होणार आहे. इंदापूरला पाटील-भरणे आणि दौंडला कुल-थोरात यांचे विळ्या-भोपळ्याचे वैर सध्या आहे. राजकारणात सध्या महायुतीत असूनही या नेत्यांचे अजिबात पटत नसल्याने इथला मार्ग महायुतीसाठी खडतर आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे विधानसभा निवडणुकीपर्यंत आपली भूमिका निश्चित करतील, त्यांनी तसे केल्यास अजित पवार गटाचे विद्यमान आमदार म्हणून त्यांचा उमेदवारीवर प्रबळ दावा असेल. अशा वेळी गेल्या वेळी त्यांच्या विरोधात लढलेले शिवसेनेचे आणि सध्या शिंदे गटात असलेले शरद सोनवणे आणि भाजपच्या आशाताई बुचके हे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, अशी स्थिती प्रत्येक मतदारसंघात आहे.

खेडमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अजित पवार गटाचे दिलीप मोहिते यांच्या विरोधात उमेदवारीसाठी भाजपकडून अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नितीन गोरे, भगवान पोखरकरअसे प्रबळ दावेदार आहेत. भोरमध्ये भाजपकडून किरण दगडे पाटील, शिवसेना शिंदे गटाकडून कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदेरे, राष्ट्रवादीकडून रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, भालचंद्र जगताप, पुरंदर तालुक्यात शिंदे गटाचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची किंवा त्यांच्या कन्या ममता शिवतारे-लांडे यांची उमेदवारी निश्चित असली, तरी भाजपचे बाबाराजे जाधवराव, जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, राहुल शेवाळे, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे असे सगळे स्पर्धक आहेत.

शिरूरमध्ये भाजपकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, प्रदेश क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्या ,शिरूर आंबेगाव विधानसभा प्रभारी जयश्री पलांडे, पुणे जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय पांचगे, घोडगंगा सहकारी कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे हे इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तालुका अध्यक्ष रवींद्र काळे इच्छुक आहेत. तर, शिवसेना शिंदे गटाकडून युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश सातव, तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद हे इच्छुक आहेत.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news