

अचानक श्रीमंत झालेल्या व्यक्तींची उदाहरणे देऊन, पंचतारांकित हॉटेलांमध्ये बैठका घेऊन गुंतवणुकीच्या बोगस योजना आणून लोकांना केवळ फसवण्याचेच नव्हे, तर अक्षरशः भिकेकंगाल करण्याचे उद्योग अलीकडील काळात वेगाने वाढले आहेत. यामध्ये कमीत कमी अवधीत जास्तीत जास्त परताव्याची आमिषे दाखवून गुंतवणूक गोळा केली जाते. सुरुवातीच्या एक-दोन महिन्यांत तसा परतावा दिलाही जातो; पण नंतर 'तेलही गेले आणि तूपही गेले' अशी अवस्था होते. 2016 मध्ये बेकायदा गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून देशभरातील सहा कोटी लोकांना फशी पाडून सुमारे 68 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा करण्यात आली असल्याचा अंदाज सीबीआयने व्यक्त केला होता. पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शारदा चिटफंड घोटाळ्यातच लाखो गुंतवणूकदारांचे 2,400 कोटी रुपये हडपण्यात आल्याचे प्रकरण काही वर्षांपूर्वी गाजले होते. अशाप्रकारच्या बेकायदा गुंतवणूक योजना सामान्यतः कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम, मल्टिलेअर्ड मार्केटिंग नावांनी चालवल्या जात असत.
अशा योजना कोणत्याही नावाने आल्या, तरी त्यात एकच समान धागा असतो, तो म्हणजे वित्तसंस्थांपेक्षा किती तरी अधिक दराने परतावा देण्याचे आमिष. राष्ट्रीय बचत योजना किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केल्याने जर दरसाल 7 ते 8 टक्के व्याज मिळत असेल, तर अशा योजना आणणारे 10 ते 20 टक्क्यांपर्यंत मासिक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवितात. अशा आमिषांना केवळ अडाणीच नव्हे, तर शिकले-सवरलेले, उच्चशिक्षित लोकही बळी पडतात. ऑप्शन ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये काही मिनिटांत, तासांत पैशांचे चक्र वेगाने फिरताना दिसते. शेअर बाजारातील निफ्टी, बँक निफ्टी, फायनान्स निफ्टी यासारख्या इंडेक्स ट्रेडिंगमध्ये पाच-सहा हजारांची गुंतवणूक करून काही तासांत 10-15 हजार रुपये मिळवले जातात, ही बाब खरी आहे; पण त्याचवेळी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लाखाचे बारा हजार रुपये झालेल्यांची संख्याही लक्षणीय आहे.
एका अभ्यासानुसार, फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगच्या 10 व्यवहारांपैकी 9 व्यवहार नुकसानदायक ठरतात. अलीकडील काळात 'सेबी' म्हणजेच बाजार नियामक संस्थेने याबाबत कठोर पवित्रा घेत ऑप्शन आणि फ्युचर ट्रेडिंगसंदर्भातील कॉल-पूट देणार्या व्हिडीओंमध्ये या व्यवहारातील धोक्यांबाबतचा उल्लेख करणारी माहिती समाविष्ट करणे तसेच 'डिस्क्लेमेशन' देणे बंधनकारक केले आहे. मात्र, याकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची तसदीही शिकली-सवरलेली माणसे घेत नाहीत. 'टेलिग्राम'सारख्या सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर आपण पाहिले, तर ऑप्शन ट्रेडिंगचे शेकडो चॅनल्स आणि ग्रुप दिसून येतात.
या प्रत्येकाकडे शेअर बाजारातून लक्षावधी रुपयांची मिळकत झाल्याची उदाहरणे असतात. तसेच रोजच्या रोज होणार्या कमाईचे स्क्रीनशॉटस् शेअर केले जातात. त्या आकड्यांना भुलून हजारो जण या ट्रेडिंगमध्ये कसलीही माहिती न घेता येतात आणि नुकसान करून घेतात. विशेषतः, मार्च 2020 नंतर संपूर्ण जग कोरोना महामारीच्या काळातील लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीमध्ये असताना, पैसे कमावण्यासाठी घरबसल्या शेअर मार्केटमध्ये पैसे लावून त्याद्वारे पैसे कमावण्याकडे सर्वसामान्य जनतेचा जास्त कल झाला होता. त्यामुळे यामध्ये पैशांची उलाढाल किती, कशी होते आणि किती झपाट्याने पैसे वाढतात, याची कल्पना अनेकांना आली; पण त्यामागची गणिते, अभ्यास, त्याचे शास्त्र समजून घेण्याची तसदी फारशी कुणी घेतली नाही. त्याऐवजी एक तर अशा चॅनल्सवरून देण्यात येणार्या माहितीच्या आधारावर ट्रेडिंग करणे किंवा अशा कंपन्यांकडे आपला पैसा गुंतवणे, याकडे बहुतेकांचा कल राहिला. त्यातूनच फसवणूक करणार्या ठकसेनांचे पेव फुटले.
अलीकडेच बंगळूर पोलिसांनी अशाप्रकारच्या 854 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून, गुंतवणूक योजनेच्या नावाखाली देशभरातील हजारो लोकांना फसवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या टोळीवर देशभरात सायबर फसवणुकीचे 5,013 गुन्हे दाखल झाल्याचे तपासात समोर आले आहे. यापैकी 17 गुन्हे बंगळूर शहरात दाखल झाले आहेत. याबाबत बंगळूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने पीडितांना व्हॉटस्अॅप, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आमिष दाखवले. 1,000 ते 10,000 रुपये गुंतवले, तर त्यांना दररोज 1,000 ते 5,000 रुपये नफा मिळेल, असे सांगितले. हजारो जणांनी 1 लाख ते 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेची गुंतवणूक त्यांच्याकडे केली. पैसे मिळाल्यानंतर आरोपी ते मनी लाँडरिंगशी संबंधित खात्यांवर पाठवायचे. विविध राज्यांतील 84 बँक खात्यांमध्ये एकूण 854 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे यातून उघड झाले आहे. यापैकी काही खाती बनावट पत्ते आणि ओळखी वापरून उघडण्यात आली होती.
काही महिन्यांपूर्वी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगून पुण्यातील चंदननगरमधील ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्याने 23 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले होते. पिंपरी-चिंचवड, आटपाडी, मुंबई, सातारा, कोल्हापूर, अशा अनेक ठिकाणच्या लोकांचे हात यामध्ये भाजले आहेत. बदलत्या काळानुसार ठकसेनांनी आता यामध्ये टेक्नॉलॉजीचा आधार मोठ्या प्रमाणावर घेतला असल्याचे दिसते. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन कर्जाचे रॅकेट उघडकीस आले होते, तेही याच शृंखलेतील.
वास्तविक पाहता, अशा गुन्ह्यांबाबत, फसवणुकीच्या धोक्यांबाबत वेळोवेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बाजार नियामक संस्था यांच्याकडून सावधगिरीच्या सूचना दिल्या जात असतात. परंतु, श्रीमंत बनण्याची मोहिनी इतकी जादुई असते की, लोकांना अंध बनवते.
त्यामुळे कसलाही मागचा-पुढचा विचार न करता लाखो रुपये ते अशा योजनांमध्ये गुंतवण्यास तयार होतात. अनेक जण यामध्ये अडकल्यानंतर शेअर बाजाराला दोष देऊन मोकळे होतात. प्रत्यक्षात शेअर बाजाराचे कामकाज हे वर्षानुवर्षे सुरू आहे आणि ते एका विशिष्ट पद्धतीने, नियमांनुसार चालते आहे. बाजारावर प्रभाव टाकणारे अनेक घटक असल्यामुळे यातील दोलायमानता मोठी असते. अभ्यासाअभावी तिचे आकलन न झाल्यामुळे अनेक ट्रेडर्सना पैसे गमावण्याची वेळ येते. त्याचवेळी यातील पैशांचे वेगाने फिरणारे चक्र बहुतेकांचे डोळे विस्फारून जाते; पण त्यातील जोखीम लक्षात घेतली जात नाही; पण जोखमीचे आकलन चुकले की, काही क्षणात लाखाचे बारा हजार होतात.
दुसरीकडे, लोकांमधील झटपट श्रीमंतीच्या वेडाचा जाणूनबुजून गैरफायदा घेणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटकही असतात. त्यांच्याही जाळ्यात जनता अडकते. अधिक परतावा मिळण्याचा आशावाद अशा फसवणूकखोरांमुळे गुंतवणूकदारांना निराशेच्या गर्तेत ढकलून जातो. याबाबत कडक कायदे करण्यात यावेत, अशी मागणी होताना दिसते. वस्तुतः, याबाबत प्रचलित कायद्यांनुसार गुन्हेगारांना शिक्षा होतच आहे. प्रश्न आहे तो अशा ठकसेनांच्या फसव्या जाळ्यात अडकण्याचा! त्याबाबत वैयक्तिक सावधगिरी हाच उपाय प्रभावी ठरतो. गुंतवणूक साक्षर बनणे किंवा गुंतवणूकतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक करणे, हाच तुमचा पैसा सुरक्षित ठेवण्याचा आणि तो वृद्धिंगत बनण्याचा राजमार्ग आहे. याला शॉर्टकट नाही!