पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुन्हा वर्चस्व निर्माण होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गटासाठी ते राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सुप्त संघर्ष
सुरू होता.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ जणांनी जुलैमध्ये भाजप- शिवसेना (शिंदे गट) यांच्या राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून प्रवेश केला.
संबंधित बातम्या :
तेव्हापासून कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणत्या पक्षाला मिळणार, याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्याबाबत निर्णय होत नव्हता. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात अस्वस्थता होती. गेले आठवडाभर अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे, पालकमंत्रिपदाचा निर्णय आज जाहीर करण्यात आला.
पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पुणे जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी अधिका-यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली होती. ते महाविकास आघाडीत असताना, त्यांनी घेतलेले काही निर्णय गेल्या वर्षभरात थांबविण्यात आले होते. त्यानंतर भाजपने घेतलेले काही निर्णय पवार यांनी थांबविल्याची चर्चा होती. त्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार दिल्याची चर्चा होती. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये सुप्त संघर्ष असल्याचे वारंवार दिसून येत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील दोन्ही महापालिका 2017 मध्ये भाजपने जिंकल्या होत्या. गेली दोन वर्षे या दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते आपापले प्रभाग बळकट करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, राष्ट्रवादीतून अजित पवार यांचा गट फुटून भाजपसोबत राज्यात सत्तेत सहभागी झाल्याने, जिल्ह्यातील राजकीय गणितेच बिघडून गेली आहेत.
दोन्ही महापालिका सध्या प्रशासकाच्या ताब्यात आहेत, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या निर्णयाला तेथे महत्त्व प्राप्त होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या हातात सत्ता एकवटण्याचा फायदा त्यांच्या गटाला होणार आहे. ग्रामीण भागातील दहापैकी सात आमदार राष्ट्रवादीचे आहेत. त्यातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांत मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यात दौरा करीत पक्ष बळकट करण्यावर भर दिला असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले. अशा वेळी अजित पवार यांना त्यांच्या गटाला ताकद देण्यासाठी पालकमंत्रिपदाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिराख्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावण्यासाठी पुढील चार-पाच महिने महत्त्वाचे ठरणार असल्याने त्यादृष्टीचे अजित पवार गटातील कार्यकर्ते अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा