लाचखोरीही झाली डिजिटल ! फोन-पेद्वारे घेतली सात हजारांची लाच

लाचखोरीही झाली डिजिटल ! फोन-पेद्वारे घेतली सात हजारांची लाच

नगर : पुढारी वृत्तसेवा : कर्ज फेडण्यास मुदतवाढ दिली. जमिनीची जप्ती टाळून लिलाव प्रक्रिया टाळण्यास मदत केल्याच्या मोबदल्यात नगर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वसुली व विक्री अधिकार्‍याने फोन पे द्वारे सात हजारांची लाच स्वीकारल्याचा प्रकार समोर आला. ऑनलाईन लाच घेणार्‍या त्या अधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यासिन नासर अरब असे त्या लाचखोर वसुली अधिकार्‍याचे नाव आहे. भोेरवाडी येथील तक्रारदाराने 2016 मध्ये केडगाव येथील भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून 5 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी आई व मामाच्या नावे असलेली भोरवाडी शिवारातील जमीन तारण म्हणून दिली होती.

संबंधित बातम्या : 

कर्जफेडीची मुदत पाच वर्षे होती, मात्र तक्रारदार मुदतीत कर्जफेड करू शकले नाहीत. सहायक निबंधक सहकारी संस्थेमार्फत तालुका पतसंस्था फेडरेशनने 25 मे 2023 रोजी वसुलीसाठी सुनावणी ठेवली होती. यावेळी तक्रारदारने वसुली अधिकारी अरब यांना कर्जफेडीसाठी दोन महिन्यांची मुदत मागितली. नंतर तक्रारदाराने 31 ऑगस्ट 2023 रोजी कर्ज फेडले होते. परंतू, त्यानंतर अरब यांनी तक्रारदाराला कर्जफेडीस दिलेल्या मुदतीच्या मोबदल्यात 30 हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली.

7 हजार रूपयांचा पहिला ऑनलाईन हप्ता स्वीकारण्याचे तर उर्वरित 13 हजार रूपये नंतर देण्याच ठरले. फोन पे द्वारे ऑनलाईन लाच स्वीकारताच अरब यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, राजू आल्हाट, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, सचिन सुद्रुक, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरुन शेख, दशरथ लाड यांनी ही कावाई केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news