धक्कादायक ! आश्रमशाळेच्या नावाखाली मुलीला केले तृतीयपंथीच्या हवाली

धक्कादायक ! आश्रमशाळेच्या नावाखाली मुलीला केले तृतीयपंथीच्या हवाली

बारामती : पुढारी वृत्तसेवा : एका महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत दोन महिलांनी तिच्या लहानग्या मुलीला आश्रमात ठेवतो, असे सांगत पुण्यात थेट तृतीयपंथींच्या हवाली केले. गेल्या वर्षभरापासून या महिलांकडे ही असाह्य महिला मुलीची भेट घालून द्या, अशी मागणी करीत होती. परंतु, या महिलांनी टाळाटाळ केली. अखेर तिने पोलिसांची मदत घेत तब्बल 14 महिन्यांनंतर आपली मुलगी परत मिळवली.
शहरानजीकच्या पिंपळी येथे राहणार्‍या महिलेने पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल आभार

संबंधित बातम्या :

व्यक्त केले. या महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. तिला आधीच तीन मुली होत्या. परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिने बारामती तालुक्याातील एका आश्रमशाळेत या तिघींना दाखल केले. त्यानंतर चौथी मुलगी जन्माला आल्यावर तिच्या पालनपोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. या विवंचनेत ती असताना तिला बारामतीत दोन महिला भेटल्या. या मुलीलाही आश्रमात ठेवू, असे आश्वासन त्यांनी दिले. तिला रेल्वेने पुण्याला नेले. तेथे एका छोट्याशा ऑफिसात तिची त्या वेळी अवघ्या 40 दिवसांची असलेली मुलगी आश्रमात ठेवतो, असे सांगत दाखल करून घेतली गेली. या महिलेच्या तीन मुली अगोदरपासूनच दुसर्‍या आश्रमशाळेत असल्याने तिला येथील परिस्थितीबद्दल शंका आली. हा कसला आश्रम? असा सवाल तिने केला. त्यावर आश्रमाचे काम सुरू असून, तात्पुरत्या स्वरूपात इथे आलो असल्याचे तिला सांगण्यात आले. तेथे एका तृतीयपंथीकडे मुलगी सोपविण्यात आली.

मुलीला सोडवून आल्यावर तिने पुन्हा मध्यस्थ दोन महिलांच्या मदतीने तिची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, या दोघींनी टाळाटाळ सुरू केली. मुलीचा ताबा कसा मिळवावा? असा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला. त्यामुळे अखेर तिने याप्रकरणी अ‍ॅड. सुधीर पाटसकर, अ‍ॅड. सोमनाथ पाटोळे, अ‍ॅड. अभिजित जगताप यांच्या माध्यमातून पोलिसांची मदत घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी निर्भया पथकाकडे ही कामगिरी दिली. त्यानुसार निर्भया पथकातील पोलिस कर्मचारी ज्योती जाधव, मोहिनी ढमे, मयूर गायकवाड यांचे पथक पुण्यात दिलेल्या पत्त्यावर पोहचले. तिथे आश्रमाचा कोणताही ठावठिकाणा नव्हता. परंतु, आश्रम चालवत असलेली व्यक्ती मार्केट यार्ड परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी मार्केट यार्ड पोलिसांची मदत घेत त्याला गाठले.

लहानग्या मुलीसंबंधी चौकशी केली असता त्याने आंबेगाव बुद्रुक येथे ही मुलगी असल्याचे सांगितले. त्यानुसार हे पथक तिथे गेले. तिथेही कोणताही आश्रम आढळून आला नाही. एक पत्र्याची खोली या आश्रमचालकाने घेतली होती. बाजूच्याच एका चाळवजा घरातील महिलेकडे ही लहानगी मुलगी पोलिसांना आढळून आली. त्यांनी तिला ताब्यात घेत तिच्या आईकडे तिला सुपूर्त केले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक दिनेश तायडे व निर्भया पथकाचा अ‍ॅड. पाटसकर यांनी सत्कार केला. तसेच आश्रमशाळेच्या नावाखाली काही गैरप्रकार होत आहे का? याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

या घटनेत मोठी गुंतागुंत आहे. आश्रमशाळाचालकाकडे कोणताही परवाना नाही. त्याच्याकडे अन्य कोणतीही बालके दाखल नाहीत. इमारत नाही. तृतीयपंथीकडे ही मुलगी मिळाली. तिला आईच्या ताब्यात देण्यात आले. परंतु, आश्रमशाळाचालकाने यापूर्वी 12 बालके सांभाळल्याचे व ती नंतर कायदेशीर पालकांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या 12 बालकांबाबतही आता तपास सुरू केला गेला आहे.
                                – गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news