पुणे : बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला | पुढारी

पुणे : बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

ओतूर, पुढारी वृत्तसेवा : ओतूर (ता. जुन्नर) येथून आपल्या सारणी शिवारातील घरी दुचाकीवरून जाणाऱ्या पिता-पुत्रावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दुचाकीवरिल ज्येष्ठ नागरिक गंभीर झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १४) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. लक्ष्मण दत्तात्रय डुंबरे (वय ७१) असे या जखमी वृद्धाचे नाव आहे.

लक्ष्मण डुंबरे हे आपला मुलगा प्रविण डुंबरे याच्या समवेत मोटारसायकलने घरी जात असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. या घटनेबाबत माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्रअधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक विश्वनाथ बेले व साहेबराव पारधी घटनास्थळी तात्काळ हजर होऊन त्यांनी जखमीला प्रथम ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. घटनास्थळ परीसरात वनखात्याच्या वतीने पिंजरा लावण्यात आला असून सारणी परीसरातही आणखी एक पिंजरा लावण्यात येणार आहे.

अहीनवेवाडी व परिसर हा पूर्वीपासूनच बिबट प्रवरन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून नागरिकांनी रात्रीच्या सुमारास पुरेसा उजेड होईल अशा लाईटची व्यवस्था करावी. एकटे कोणीही बाहेर फिरु नये, सोबत बॅटरी असावी, मोबाईलवरील गाणी वाजवावी, पशुधन हे बंदिस्त गोठ्यातच बांधावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button