गोंदिया : लाचखोर तहसीलदारासह नायब तहसीलदार व संगणक ऑपरेटर जाळ्यात | पुढारी

गोंदिया : लाचखोर तहसीलदारासह नायब तहसीलदार व संगणक ऑपरेटर जाळ्यात

गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : वाळू वाहतूक प्रकरणी जप्त केलेले दोन टिप्पर सोडण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी करणार्‍या गोरेगाव येथील तहसीलदारसह नायब तहसीलदार व खासगी संगणक ऑपरेटरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि.७) तहसील कार्यालयात सापळा कारवाई करून ताब्यात घेतले. किसन कचरू भदाणे (वय ५०) असे लाचखोर तहसीलदाराचे तर ज्ञानेश्वर रघुजी नागपुरे (वय ५६) नायब तहसीलदार व खाजगी ईसम संगणक ऑपरेटर राजेंद्र गोपीचंद गणवीर ( वय ५२ रा. घुमर्रा, ता. गोरेगाव) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

संबंधित विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील रहिवाशी असून त्यांचे व त्यांच्या मित्राचे बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीचे सहाचाकी प्रत्येकी एक टिप्पर आहेत. दरम्यान, दि. ४ मार्च २०२४ रोजी दोन्ही टिप्पर मधुन प्रत्येकी २ ब्रास वाळू वाहतूक करताना तालुक्यातील गिधाडी शिवारात मंडळ अधिकारी व पथकाने दोन्ही टिप्पर पकडून तहसील कार्यालय गोरेगाव येथे जमा केले. यावेळी आरोपी तहसीलदार याने तक्रारदार व त्यांचा मित्र यांना एक ब्रासचे चालान भरण्यास सांगितल्यावरून त्यांनी ६ मार्च २०२४ रोजी तक्रारदार व त्यांचा मित्र यांनी प्रती वाहन प्रमाणे १ लाख २३ हजार ८८३ रुपयांचे चलान बॅंकेत भरले व त्याच्या पावत्या घेऊन तहसील कार्यालय गोरेगाव येथे गेले.

मात्र, त्यांना टिप्परच्या चाव्या दिल्या नाहीत. दरम्यान गावातील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना गावात भेटुन सांगितले की, तुमचे टिप्पर सोडण्यासाठी व या पुढे वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी प्रती वाहन ५० हजार रुपये प्रमाणे दोन्ही वाहनांचे १ लाख रुपये किसन भदाणे तहसीलदार गोरेगाव यांना द्यावे लागतील असा निरोप दिला. लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार व त्यांचा मित्र यांनी दंडाच्या रकमेचे चालान भरलेले असताना देखील आरोपी तहसीलदार याने जप्त वाहने सोडण्याकरीता ‘आणखी एक चालान भरा ‘अशी कार्यालयीन कामकाजाची भाषा द्विअर्थी वापरून जप्त दोन्ही वाहने सोडण्यासाठी एक लाख रूपयांची लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली.

तर लाचेची रक्कम आरोपी खाजगी ईसमाकडे देण्यास सुचीत केले. खाजगी ईसमाने फिर्यादी सोबत असलेल्या पंचाकडे चौकशी केली असता त्यास पंचाबाबत संशय आल्याने लाच स्विकारली नाही. दरम्यान, आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपींच्याविरूध्द गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.

तयार केला बनावट इंडेमनेटी बाँड

तक्रारदार व त्यांचा मित्र यांच्या टिप्पर मध्ये प्रत्येकी २ ब्रास वाळू असताना व प्रत्येकी २ ब्रास वाळू सह वाहने जप्त केल्याबाबतचे पंचनामे मंडळ अधिकारी व पथकाने तहसीलदार यांना सादर केले असताना तहसीलदार यांनी नायब तहसीलदार व खासगी इसमासह संगनमताने जप्त केलेली वाहने ही २ ब्रास रेती असलेले टिप्पर नसुन त्यामध्ये एक ब्रास रेती होती. असे दाखवण्याकरीता इंडेमनेटी बाँड तयार करताना सदरचे वाहन हे ट्रॅक्टर असल्याचे नमूद करून बनावट कागदपत्रे तहसील कार्यालयात तयार केले. तसेच नायब तहसीलदार तक्रारदारास इंडेमनेटी बाँड तयार करून देण्यास मदत केल्याच्या मोबदल्यात पार्टी देण्याची मागणी केली.

ठाणे जिल्ह्यातही घेतली होती लाच

आरोपी तहसीलदार यास यापूर्वी ठाणे येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना १० लाख रुपये लाच स्वीकारल्या बाबत सन २०१७ मध्ये ठाणे नगर पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे गुन्हा दाखल आहे.

Back to top button