पाटणकरांचा ‘ट्रेलर’ तर ना. देसाईंचा ‘शोले’ | पुढारी

पाटणकरांचा ‘ट्रेलर’ तर ना. देसाईंचा ‘शोले’

पाटण : गणेशचंद्र पिसाळ : जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाल्यावर राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ चा नारा दिल्यावर त्याला तेवढ्याच तत्परतेने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी 2024 च्या निवडणुकीत सुपरहिट ‘शोले’ दाखवण्याचे प्रतिआव्हान दिले. शोले स्टाईल राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.

महाविकास आघाडी प्रयोगानंतर नाईलाजाने राजकीय संसार करायला भाग पडलेल्या तालुक्यातील राष्ट्रवादीचा पाटणकर गट आणि शिवसेनेच्या देसाई गटातील मनोमिलनाचा जिल्हा बँक निवडणुकीत काडीमोड झाला. जिल्हा बँक प्रचारापासून ते आता निकालानंतरही पूर्वीप्रमाणेच राजकीय शेरेबाजी, टोलेबाजी सुरू होती.

संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर आरोप-प्रत्यारोप, श्रेय वादात नेहमीच अग्रेसर असलेल्या या तालुक्यात पावणेदोन वर्षे असलेली राजकीय शांतता कोणालाच पचनी पडत नव्हती. आता पुन्हा जुन्या पायवाटा चोखाळायला सुरुवात झाल्याने निश्चितच या मान्यवरांचे राजकीय फड चांगलेच रंगणार आहेत. जिल्हा बँकेत विजय मिळाल्यानंतर सत्यजितसिंहांची महारॅली, जल्लोष पाहायला मिळाला.ऊर्जा मिळालेल्या सत्यजितसिंहांनी ना.देसाई यांच्यावर त्याच पटीत तोंडसूख घेतले. चित्रपटांतील डायलॉग प्रमाणेच ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ये तो बस ट्रेलर है’ अशी डायलॉगबाजी केली. यावर शंभूराज देसाई यांनी आपला तोच जोश आणि स्टाईलमध्ये यांना प्रतिआव्हान दिले. सत्यजितसिंहांनी भलेही ट्रेलर दाखवला असला तरी आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपण सुपरहिट शोले पिक्चर दाखवू असे खूले आव्हान शंभूराज देसाई यांनी दिले.

पाटण तालुक्याला नेतेमंडळींची ही स्टाइल नवीन नाही. परंतु या आव्हाने प्रतिआव्हानात सर्वसामान्य जनतेच्या पदरात नक्की काय पडले हे उत्तर कोणताही नेता, पदाधिकारी अगदी मतदारही देऊ शकत नाही. या तालुक्यात अद्यापही बहुतांशी समस्या कायम आहेत. कोयना धरणाच्या कोयनेसह अन्य धरणांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासह शेजारच्या राज्यांनाही पाणी, निम्म्याहून अधिक राज्याला वीज देणार्‍या या तालुक्यातील अनेक गावे पाणी, वीज, शाळा, आरोग्य ,मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित आहेत.

विकासकामांचा भलेही दोन्ही बाजूंनी डांगोरा पिटला जात असला तरी कराड-पाटण आणि पाटण ते कोयना घाटमाथा हा राष्ट्रीय महामार्गाची अवस्था खूप काही सांगून जातेे. स्थानिक नेत्यांनी येणार्‍या काळात राजकीय संघर्ष जरूर करावा पण जनतेचे होणारे हालही लक्षात घ्यावेत.

पाटण मतदार संघात पाटणकर व देसाई गटाकडून नेहमी विकासकामांवर चर्चा केली जाते. प्रत्यक्षात विकासकामांची अवस्था काय याचा विचार नेत्यांनी करायला हवा. सर्वसामान्य जनतेचे खूप प्रश्न आहेत. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या वर्षानुवर्षे प्रलंबीत आहेत, याकडेही नेते मंडळींनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

मतदारांच्या मागे कोणी नेता आहे का?

मुळातच येथील स्थानिक जनता लक्षात घेता निम्मे पाटणकर गट, निम्मे देसाई गटाकडे कायमच आहेत. मतदारांच्या पाठीमागे कोणी नेता आहे का? हे मात्र दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षात कोणाच्याही लक्षात आले नाही. दोन्ही गटाचे कार्यकर्ते मात्र नेत्यांचे गोडवे गाण्यात मग्न आहेत.

Back to top button