Lok Sabha Election : … म्हणून ‘या’ बाहुबलींनी पत्नीला उतरवले मैदानात! | पुढारी

Lok Sabha Election : ... म्हणून ‘या’ बाहुबलींनी पत्नीला उतरवले मैदानात!

सुनील डोळे

येत्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये आनंद मोहन, अवधेश मंडल, रमेशसिंह कुशवाह आणि अशोक महातो या चार बाहुबलींना निवडणूक लढता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर तोडगा म्हणून यातील प्रत्येकाने आपल्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याचे ठरवले आहे. स्वतःच्या गुंडगिरीला या वेगळ्या पद्धतीने राजाश्रय मिळवून देण्याचा हा मार्ग बिहारमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ( Lok Sabha Election )

बिहारमध्ये बाहुबली नेत्यांची मुळीच कमतरता नाही. त्यामुळे तेथे मतदानावेळी हिंसाचाराच्या घटना घडणे हे नेहमीचेच चित्र आहे. तेथील राजकारणात बाहुबली नेत्यांचे वर्चस्व वर्षानुवर्षे दिसत आले आहे. यावेळची निवडणूकही त्यास अपवाद नाही. यातील आनंद मोहन, अवधेश मंडल, रमेशसिंह कुशवाह आणि अशोक महातो या चार बाहुबली नेत्यांना गंभीर गुन्ह्यांबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे नियमानुसार ते निवडणूक लढवू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून या चौघांनीही आपल्या अर्धांगिनींना निवडणूक रिंगणात उतरविण्याचे पक्के केले आहे. काहीही करून आपल्या कुटुंबातील सदस्य लोकसभेत पोहोचावा, हा त्यामागील उद्देश आहे. त्यासाठी या सर्वांनी तिकिटाची व्यवस्था केली आहे. यातील प्रत्येकाने पत्नीला पुढे केले असले, तरी पत्नीच्या माध्यमातून हीच मंडळी नंतर अधिकार गाजवणार, हेही उघड आहे.

लव्हली आनंद

माजी खासदार आनंद मोहन यांनी आपला प्रभाव वापरून पत्नी लव्हली यांच्यासाठी सत्तारूढ जदयूकडून तिकिटाची व्यवस्था केली आहे. त्या शिवहर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. आनंद मोहन यांनी 1996 आणि त्यानंतर 1998 मध्ये याच मतदार संघातून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. 1994 मध्ये गोपालगंजचे जिल्हाधिकारी जी. कृष्णय्या यांच्या हत्येचा आरोप आनंद यांच्यावर होता. त्यांना या प्रकरणात सोळा वर्षांची शिक्षा झाली. नंतर नितीश कुमार सरकारने तुरुंगविषयक नियमांत काही बदल केले व त्यामुळे तुरुंगातून सोळा वर्षांनंतर आनंद यांची सुटका झाली. 2019 मध्ये लव्हली यांनीही राजदच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारले होते. यावेळी त्या सत्तारूढ जदयूच्या तिकिटावर मैदानात उतरल्या आहेत.

बीमा भारती 

कुख्यात गुंड अवधेश मंडल याने पत्नी बीमा भारती यांना पूर्णिया लोकसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. अवधेश याच्यावर खून, अपहरण यांसारखे डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पूर्णिया परिसरात त्याची प्रचंड दहशत आहे. यास्तव तो लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाही. विशेष म्हणजे बीमा भारती पाच वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी नुकताच जदयूचा राजीनामा दिला असून यावेळी त्या राजदच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

विजयलक्ष्मी देवी

जदयूच्या तिकिटावर सिवान लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असलेल्या विजयलक्ष्मी देवी या बाहुबली नेता रमेशसिंह कुशवाह यांची पत्नी आहेत. रमेशसिंह हे खून प्रकरणातील मुख्य आरोपी असून, अनेकदा जेलची हवा खाऊन आले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी ते आमदार म्हणून निवडून आले होते. सध्या कविता सिंह सिवानच्या खासदार असून बाहुबली नेता अजय सिंह याच्या त्या पत्नी आहेत. यावेळी त्यांचा पत्ता कापून नितीश कुमार यांनी विजयलक्ष्मी देवी यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

अनिता कुमारी

राजदच्या तिकिटावर यावेळी मुंगेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असलेल्या अनिता कुमारी बाहुबली अशोक महातो याच्या पत्नी आहेत. नवादातील तुरुंग फोडल्याच्या प्रकरणात महातो याला सतरा वर्षांची शिक्षा झाली होती. 2023 मध्ये तो तुरुंगातून सुटून आला. मात्र, एवढी मोठी शिक्षा झाल्यामुळे त्याला निवडणूक लढवता येणार नाही. यावर तोडगा म्हणून त्याने अनिता देवी यांच्याशी लग्न केले. त्यापूर्वी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याकडून त्याने पत्नीसाठी तिकीट पक्के करून घेतले. अनिता देवी यांची लढत जदयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह यांच्याशी आहे. ( Lok Sabha Election )

Back to top button