नाशिक : राजाभाऊंच्या गावात रंगली माणिकरावांची ‘चाय पे चर्चा’ | पुढारी

नाशिक : राजाभाऊंच्या गावात रंगली माणिकरावांची 'चाय पे चर्चा'

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांकडून सर्वत्र विकासकामांच्या भूमिपूजन, लोकार्पणाची लगबग सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही गेले काही दिवस असाच धडाका लावला होता. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या काही तास अगोदर शनिवारी (दि.16) त्यांची एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील डुबेरे येथे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांसमवेत ‘चाय पे चर्चा’ रंगली. त्यात आमदार कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीत डुबेरेकरांनाही हळद लागू शकते, असे वक्तव्य केले. त्यावरून नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्यापही डुबेरेकर असलेले माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव स्पर्धेत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

डुबेरेतील श्रीराम मंदिरासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार कोकाटे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता. अपरिहार्य कारणास्तव प्रकाशभाऊ या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. सिन्नर शहरात तळ्यातील भैरवनाथ मंदिर आणि पडकी वेस भागातील कमळेश्वर कुंड येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वाजे-कोकाटे एकत्र आले होते. परिणामी, त्यांच्या मनोमिलनाची चर्चा रंगली होती.

डुबेरेतील विकासकामाची कुदळ मारल्यानंतर नारायण वाजे, काशीनाथ वाजे, कारभारी वारुंगसे, सरपंच ज्ञानेश्वर ढोली आदींनी माणिकरावांना चहाचा आग्रह केला. सगळे एका टपरीवजा हॉटेलच्या शेडमध्ये स्थानापन्न झाले. चहा आला आणि सुरू झाली ‘चाय पे चर्चा’… ‘साहेब, पाण्याचा प्रश्न बिकट आहे.’, ‘साहेब अमुक एका रस्त्याकडे लक्ष द्या’, ‘पूरचारीचं तेवढं बघा’, असे एकेक करीत प्रश्न पुढे येऊ लागले. माणिकराव जिव्हाळ्याचे प्रश्न समजून घेत उत्तरे देत होते. अशात एकाने हळूच लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचा विषय छेडला. त्यावर हजरजबाबी माणिकरावांनी, अजून दोन दिवस काहीच सांगता येत नाही. कदाचित तुमच्या डुबेरेकरांना (राजाभाऊ वाजे) हदळ लागू शकते, असे सांगितले. त्यामुळे उपस्थितांचे कान टवकारले आणि राजाभाऊ वाजे अद्यापही महाविकास आघाडीकडून चर्चेतला चेहरा असल्याचे अधोरेखित झाले.

दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हाही माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या लोकसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवारीची चर्चा झडली. मात्र, प्रकाशभाऊ वाजे यांनी ही सदिच्छा भेट होती, असे सांगून चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

‘एकेकाळी डुबेरेकरांनी भरभरून दिले’
‘साहेब, डुबेरे गाव परिसरासाठी चांगला निधी दिला’, असे बोलून एका कार्यकर्त्याने आमदार कोकाटे यांचे आभार व्यक्त केले. त्यावर आमदार कोकाटे यांनी ‘एकेकाळी डुबेरेकरांनी मला भरभरून दिलेले आहे. त्यापुढे हा निधी क्षुल्लक आहे. डुबेरेसाठी कितीही दिले तरी कमीच आहे’, असे सांगून एकाअर्थाने डुबेरेकरांचे ऋण व्यक्त केले. कोकाटे खरे बोलले. 1999 आणि 2004 अशा दोन विधानसभा पंचवार्षिक निवडणुकात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या विरोधात प्रकाशभाऊ वाजे यांनी त्यांना मोलाची साथ दिली. या काळात डुबेरेकरांनी एकगठ्ठा मतदान कोकाटे यांच्या झोळीत टाकले. मात्र, 2009 च्या निवडणुकीपासून वाजे कुटुंबातून उमेदवारी होऊ लागल्याने इथल्या मतदारांचा कल कोकाटे यांच्या विरोधात गेला.

हेही वाचा:

Back to top button