छत्रपती संभाजीनगर : वृद्धेला डांबून मारहाण करीत लुटमार; सहा तोळे सोने, ५५ हजार रोकड लंपास | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : वृद्धेला डांबून मारहाण करीत लुटमार; सहा तोळे सोने, ५५ हजार रोकड लंपास

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चाकू, कुऱ्हाड, कोयता, रॉड घेऊन घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी वृद्धेला डांबून बेदम मारहाण करीत कपाटातील ६ तोळे सोने आणि ५५ हजार रुपये रोकड, असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. पैसे और सोना कहा है, असे धमकावत दरोडेखोरांनी वृद्धेला मारहाण केली. गांधेली येथे १४ मार्च रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास लुटमारीची ही घटना घडली.

रुख्मणबाई पांडुरंग वाडेकर (५५, रा. गांधेली), असे जखमी वृद्धेचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार, मुलगा निवृत्ती, सून आणि नात, असे कुटूंब आहे. निवृत्ती हे कीर्तनकार आहेत. १३ मार्चच्या रात्री जेवन करून रात्री दहा वाजता ते झोपी गेले. रुख्मणबाई या बैठकखोलीत झोपल्या. तर मुलगा, सून आणि नात त्यांच्या खोलीत झोपी गेले. १४ मार्चच्या पहाटे दीड वाजता दरवाजाचा कोंडा खोलून दोन दरोडेखोर घरात घुसले. त्यांनी चाकू, कुऱ्हाड, कोयता आणि रॉडचा धाक दाखवून रुख्मणबाई यांना गप्प केले. कहाँ रखा है, पैसा और सोना, असे म्हणत मारहाण सुरु केली. रुख्मणबाई यांच्याच स्कार्फने त्यांचे दोन्ही हात पाठीमागे घेऊन बांधले. त्यानंतर खुंटचा शर्ट घेऊन तोंड बांधले. त्यामुळे रुख्मणबाई या आरडाओरड करू शकल्या नाहीत. रॉडने मारहाण केल्यावर रुख्मणबाई यांनी कपाटाची चावी सांगितली. दरोडेखोरांनी त्या चावीने कपाट उघडून सोन्याच्या प्रत्येकी ३ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, १ तोळ्याची अंगठी, सोन्याचा झुंबर जोड, आठ ग्रॅमची पोत, ५ ग्रॅमचे झुंबर वेल, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, पुणेरी नथ, चांदीचे जोडवे आणि पैंजन तसेच, ५५ हजार रुपये रोकड लंपास केली.

बैठक खोलीतील आईला दरोडेखोरांनी डांबून बेदम मारहाण केली. कपाटातील सर्व ऐवज लुटून नेला. तरीही बेडरूममधील मुलगा आणि सुनेला जाग आली नाही. ऐवज लुटून दराेडेखोर निघून गेल्यावर रुख्मणबाई कशाबशा मुलगा झोपलेल्या खोलीकडे गेल्या. हात बांधलेले असल्याने पायाने त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवून त्यांना उठविले. त्यानंतर रुख्मणबाईंची सुटका झाली. त्यांनी शेजाऱ्यांना जागे केल्यावर डायल ११२ ला कॉल करून पोलिसांना कळविले. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक योगेश खटाने करीत आहेत.

Back to top button