Nashik | शहरात मिळून आले १,४०० ‘बंदूकबाज’ | पुढारी

Nashik | शहरात मिळून आले १,४०० 'बंदूकबाज'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाने शस्त्र परवानाधारकांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे परवाना शस्त्रधारकांची माहिती संकलित करून त्यांच्याकडून ती शस्त्रे निवडणूक कालावधीपर्यंत ताब्यात घेण्याची प्रक्रिया करणार आहे. शहरात सुमारे १,४०० जणांकडे अधिकृत शस्त्रपरवाना असल्याचे समोर आले आहे. त्यात पोलिस, भारतीय सैन्य दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे सर्वाधिक शस्त्र असून, उर्वरितांमध्ये राजकीय, सामाजिक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी व इतर व्यक्तींकडे शस्त्र आहेत.

नोकरीचा भाग म्हणून किंवा जीवास धोका असल्यास नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा अधिकृत परवाना दिला जातो. त्यानुसार शहर पोलिसांनी दिलेल्या परवान्यांनुसार शहरात १,४०० परवानाधारक नागरिक शस्त्र बाळगत आहेत. त्यात सुमारे ६० ते ७० टक्के हे पोलिस व भारतीय सैन्य दलातील आजी-माजी अधिकारी व कर्मचारी आहेत. पोलिस आयुक्तालयामार्फत स्वसंरक्षणार्थासाठी शहरातील व्यक्तींना शस्त्राचा परवाना देण्यात आला आहे. या परवान्यानुसार संबंधितांची वेळोवेळी चौकशी करून शस्त्रासंदर्भात माहिती पोलिसांतर्फे नोंदविण्यात येते. दरम्यान, निवडणूक सुरू होत असल्याने आचारसंहिता लागू झाल्यापासून परवानाधारक व्यक्तींनादेखील त्यांची शस्त्रे आयुक्तालय अथवा संबंधित पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागात जमा करावी लागतात. त्यासाठी शहर पोलिसांनीही नियोजन सुरू केले आहे. शहरात शस्त्र परवाने दिलेल्या व्यक्तींच्या वर्गवारीनुसार आयुक्तालयातर्फे लवकरच संबंधितांना सूचना करून शस्त्रे ताब्यात देण्यास सांगितले जाणार आहे. तसेच काहीजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याबाबतही आयुक्तालय विचाराधीन आहे. यात ६५ पेक्षा अधिक वय असणारे आणि शस्त्राचा गैरवापर केल्याचे आढळल्यास त्या व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द होण्याची शक्यता आहे.

कुणाला मिळतो शस्त्र परवाना?
शस्त्र बाळगण्याची परवानगी सरसकट सर्वांना नसते. शस्त्र परवाना मिळवण्याच्या नियमावलीमध्ये एखाद्या नागरिकास त्याच्या जीवितास धोका आहे असं वाटत असेल, तर ती व्यक्ती शस्त्र परवान्यासाठी अर्ज करू शकते. अशा व्यक्तीस स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळू शकतो. याशिवाय, सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही शस्त्र बाळगण्याचा परवाना नियमावलीची पूर्तता केल्यानंतर मिळतो.

शस्त्रपरवाना मिळवण्याची प्रक्रिया
नागरिकाला शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळण्याची तरतूद आर्म्स ॲक्ट २०१६ (arms-act-2016) मध्ये करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीविताला धोका आहे असे वाटत असल्यास त्या व्यक्तीला त्यासंदर्भात आधी पोलिसांत फिर्याद दाखल करावी लागते. त्यानंतर त्या व्यक्तीला संबंधित पोलिसांकडे ऑनलाइन पोर्टलवरून शस्त्र परवाना मिळण्यासंदर्भात अर्ज दाखल करावा लागतो. ऑनलाइन अर्ज आल्यानंतर त्या व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली जाते. संबंधित व्यक्तिविरोधात गंभीर गुन्हा दाखल असल्यास त्याला परवाना मिळत नाही. ज्या व्यक्तीला परवाना हवा आहे, त्याच्याबाबत सखोल चौकशी केली जाते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिस मुलाखतीसाठी बोलावतात. यावेळी संबंधित व्यक्तीची पूर्ण चौकशी केली जाते. तसेच, या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याचीदेखील तपासणी केली जाते. यानंतर हा अहवाल एनसीआरबीला आणि गुन्हे शाखेला पाठवला जातो. त्यावर संबंधित यंत्रणांकडून मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित व्यक्तीला शस्त्रपरवाना दिला जातो. परवाना मिळाल्यानंतर संबंधित व्यक्ती शस्त्रनिर्मिती करणाऱ्या अधिकृत कंपन्यांकडून शस्त्र खरेदी करू शकते. खरेदीनंतर या शस्त्राची रीतसर नोंदणीही करणे बंधनकारक असते.

यांना मिळतो शस्र परवाना
शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम १३ शस्त्र परवाना अंतर्गत पिस्टल, रिव्हॉल्व्हर, रायफल या शस्त्रांचा परवाना मिळतो. अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, शूटिंग प्रशिक्षण सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट, ३ वर्षाचे आयकर फॉर्म, हमीपत्र असे कागदपत्रे दिल्यानंतर पोलिसांकडून त्याची छाननी होते. पोलिस आयुक्त अंतिम आदेश देतात व परवाना वितरीत होतो. कागदपत्रे पूर्तता करणारा अर्जदार, बँक सुरक्षा कर्मचारी, पोलीस व सैन्य दलातील अधिकारी आणि कर्मचारी, खेळाडू यांना शस्त्र परवाना दिला जातो.

अद्याप एकानेही शस्त्राचा वापर केलेला नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या परवाना धारक नागरिकांकडे शस्त्र आहेत त्यांनी अद्यापपर्यंत एकदाही स्वरक्षणार्थ किंवा गैरकृत्यात शस्त्राचा वापर केलेला नाही. त्यामुळे संबंधित परवानाधारकांना नुतनीकरण करताना कोणतीही अडचण किंवा गुन्हे दाखल झालेले नाहीत.

Back to top button