मोठी बातमी! २० जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण : जरांगे-पाटील यांची घोषणा | पुढारी

मोठी बातमी! २० जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण : जरांगे-पाटील यांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाची सरकार फसवणूक करत आहे. सरकारला मराठा जात संपवायची आहे. आंदोलन शांततेत करायचं हेच आपलं ब्रम्हास्त्र आहे. आता २० जानेवारी २०२४ पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला जाईल,  अशी घोषणा मनाेज जरांगे-पाटील यांनी आज (दि.२३) बीड येथील जाहीर सभेत केली. मराठा आरक्षण आंदाेलन शांततेच्‍या मार्गानेच सुरु राहिल. जो हिंसा करेल तो आपला नाही असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, नोटीसा मराठा बांधव कोणी शेतात, बाहेर गावी असताना घरी नोटीसा दिल्या. ट्रॅक्टर घेऊ जावू नको म्हणून नोटीसा दिल्या. मग मराठा म्हणाला. मी कुठेच नाही, नोटीसा दिल्या तर मग आता सगळ्यात पुढे मी असेन. कितीही नोटीसा देऊद्या. आंदोलन करायचे परंतू शांततेत. शांततेच्या आंदोलनात खरी ताकत आहे. आपले शांततेचे आंदोलन कोणीच रोखू शकत नाही, असे सांगत सहन कधी पर्यंत करायचे. सुरूवातीला महिनाभराचा वेळ घेतला. आता 24 डिसेंबर तारीख सांगीतली. आणखी किती दिवस तारखा सांगणार? मराठ्यांनी कधीपर्यंत वाट पहायची? असे सांगत सभेतील उपस्थित मराठा बांधवांना तारीख ठरावायची का? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. गाफील राहु नका, मागं पुढे पाहून पाऊल टाका, काटे- कुटे पहा असे सांगत सरकारने 24 तारखेला मराठे मुंबईत येतील म्हणून 18 तारखेपर्यंत 144 कलम लागू केले. ठिक आहे, असू द्या 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी अमरण उपोषणाला बसणार आहे. मला भेटायला मराठे येतील. त्यांना कसे आडवाल? असा सवाल करत मराठ्यांना कधीपर्यंत दाबून ठेवणार आहात? असा सवाल करत दिलेली 20 तारीख पटली का? तारीख बदलायची का? म्हणत उपस्थित लाखो मराठा बांधवांना जरांगे पाटील यांनी विचारना केली. यावेळी लाखो मराठा बांधवांनी हात वर करत 20 तारखेच्या आंदोलनाला अनुमोदन दिले. वर करून अनुमोदन देण्याचे सुचवले. यावेळी उपस्थित लाखो मराठा बांधवांनी हात उंचावून हो असे सांगीतले.

व्हिडिओ..

आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही

सरकारने मराठा आरक्षणप्रश्‍नी शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहीजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहनही या वेळी मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्‍नी नोव्हेंबरमध्ये सरकारला २४ डिसेंबर अल्टिमेटम दिला होता. सरकारने याबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतला नाही. यामुळे आज पुन्‍हा एकदा जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आता मराठा आरक्षणप्रश्‍नी निर्णय घेण्‍यासाठी राज्‍य  सरकारकडे २० तारखेपर्यंत वेळ असेल, असेही जरांगे-पाटील यावेळी म्हणाले.

भुजबळांवर सडकून टीका

भुजबळांचे नाव न घेता, मला शिव्या दिल्या म्हणून सांगतात. अरे नादी लागू नको म्हणून सांगीतलं होतं. काही दिवसांनी केळाच्या सालपटी अन् फाटक्या पिशव्या हातात घ्याव्या लागतील. मध्यंतरी मला गिरीश महाजन भेटायला आले. त्यांनी सांगीतले. “मी त्यांना (भुजबळ) समज दिली.” यामुळे मी थोडा शांत झालो. येडपट बुजगावनं आरक्षण देऊ देणार नाही, म्हणून सांगतय. परंतू आरक्षण मिळवूनच दाखवतो. एकदा आरक्षण मिळवू दे तुला कचकाच दाखवतो. लई फडफड करतो, तुला मराठ्यांची ताकत दाखवून देतो. कारण मराठा आरक्षणाला विरोध करणारा कोणीही असू द्या, त्याला माफी नाही. अशा शब्दात जरांगे पाटील, यांनी भुजबळ यांचा समाचार घेतला.

पाठीशी उभे न राहणार्‍या नेत्यांना दारात उभे करू नका

हा लढा मराठा समाजाच्या लेकरांचा अन् त्यांच्या भविष्याचा आहे. या परिस्थितीत मराठा समाजाचे आमदार, मंत्री, नेत्यांना ईशारा देतो. जो या निकराच्या लढ्यात मराठा समाजाच्या पोरांच्या पाठीशी उभे राहणार नाही, त्याला मराठा समाजाचे दार बंद. पाठीशी उभे न राहणार्‍या नेत्यांना दारातही फिरकू देऊ नका, असे आवाहन उपस्थित मराठा बांधवांना जरांगे पाटील यांनी केले. ते बीड येथील विराट सभेत बोलत होते. दरम्यान जरांगे पाटील यांच्यावर 201 जेसीबी अन् हेलीकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवचरित्रकार ज्ञानदेव काशीद यांनी केले. यावेळी महिला, तरूण, अबालवृध्दांसह मराठा बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक ईशारा सभेला लाखो लोक उपस्थित राहणार असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. पहाटेपासून ठिकठिकाणचे रस्ते, शहरातील चौक व मुख्य ठिकाणी पोलिस कर्मचारी, अधिकारी रस्त्यावर उभे होते. सभेच्या परिसरात ड्रोन कॅमेर्‍यासह वेब कॅमेर्‍याने वॉट ठेवण्यात आला. काही अनुचीत प्रकार घडून नये, वाहतुक व्यवस्था कोलमडू नये, यासाठी दरम्यान सोलापूर- धुळे महामार्गावरील वाहतूक मांजरसुंबा व पाडळशिंगी, माजलगाव फाटा या ठिकाणाहून वळवण्यात आली होती.

मुस्लिम बांधवांनी केले स्वागत

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभेपूर्वी बीड शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या दरम्यान शहरात ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. बार्शी नाका भागात रॅली आल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांकडून जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो मुस्लीम बांधव आणि मुस्लीम समाजातील धर्मगुरू देखील उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button