सरकार जनहितासाठीच, खोट्या अहंकारासाठी नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

सरकार जनहितासाठीच, खोट्या अहंकारासाठी नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वंकष प्रयत्नरत आहे. या राज्याची वाटचाल प्रभू श्रीराम व शिवाजी महाराजांच्या विचारांवर मार्गक्रमण करीत आहे. हनुमान चालीसा पठनाला व प्रभू श्रीरामाला या राज्यात आता कधीच विरोध राहणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सरकार सत्तेवर आले असून खोट्या अहंकाराला खतपाणी घालत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने अमरावती येथील हनुमान गढी येथे प्रसिध्द कथा वाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून ‘शिवमहापुराण कथे’चे आयोजन आज करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा व कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकुमार जाजोदीया, सुनील राणा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

… त्यांच्या लंकेचे दहन झाले

ज्‍यांनी हनुमान चालिसा पठनाला विरोध केला, त्‍यांच्‍या सत्‍तेच्‍या लंकेचे श्री हनुमानाच्‍या कृपेने दहन झाले आणि राज्यात सत्तापरिवर्तन झाले. प्रभू श्रीराम आणि हनुमानाच्‍या आशीर्वादाने सर्वसामान्‍यांच्‍या मनातले सरकार स्‍थापन झाले, अशा शब्‍दात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता यावेळी त्‍यांच्‍यावर टीकाही केली.

मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर, नेहमी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच कार्य करीत राहणार आहे. अयोध्याच्या धर्तीवर येथील हनुमान गढी येथे 111 फुटाची भव्य रामभक्त हनुमानाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. ही अत्यंत अभिनंदनास्पद बाब असून हनुमानाच्या नावारुपाला शोभेल असे हे ठिकाण भविष्यात जनसामान्यांचे आध्यात्मिक तीर्थस्थळ बनेल, असेही ते म्हणाले.

याठिकाणी सलग पाच दिवस प्रसिध्द कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून शिवमहापुराण कथेचे लाखो भाविकांना श्रवण करता येणार आहे. या भव्य-दिव्य आयोजनाबद्दल त्यांनी राणा दाम्पत्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला उपस्थित विशाल जनसागर, महिलामंडळ, अबालवृध्द यांचे स्वागत करीत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शिवमहापुराणातील शिकवणची समाजाला आवश्यकता आहे. अशा कार्यक्रमांच्या आयोजनातून प्रभू श्रीराम व त्यांचे परमभक्त हनुमान यांच्याविषयी समाजाला चांगली जाण होऊन ते त्याप्रमाणे आचरण करतील. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन रामराज्य निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी शिवमहापुराण कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करुन त्यांच्याकडून आर्शिवाद प्राप्त केले. हा शिवमहापुराण कथेचा सोहळा दि. 16 ते 20 डिसेंबरपर्यंत सलग पाच दिवस दररोज दुपारी 1 ते 4 या वेळेत चालणार आहे. अंदाजे दीड ते दोन लाखांपेक्षा जास्त भाविक शिवमहापुराण कथा श्रवण करीत आहेत. अयोध्येला प्रभू श्रीरामाचे भव्य मंदीर निर्माण होत आहे. हा कार्यक्रम 22 जानेवारीला होणार असून त्यासाठी सर्वांनी जायचे आहे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

बेलोरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत

तत्पूर्वी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बेलोरा विमानतळावर नागपूरहून विमानाने आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार आदींनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Back to top button