Nashik Heavy Rain : साहेब, दुष्काळात जगवली पण निसर्गानं सगळं हिरावलं! शेतकरी महिलेचा टाहो | पुढारी

Nashik Heavy Rain : साहेब, दुष्काळात जगवली पण निसर्गानं सगळं हिरावलं! शेतकरी महिलेचा टाहो

चांदवड : सुनील थोरे

भीषण दुष्काळी परिस्थितीत द्राक्षबाग पाणी विकत आणून फुलवली. महागडी औषधे फवारली. पोषक वातावरणाने चार एकर बाग बहरली. विक्री योग माल होऊन चांगला दाम मिळून कर्ज फिटेल, मुलींचे शिक्षण, लग्न चांगले करू अशी एक ना अनेक स्वप्न रंगवत होतो. मात्र, निसर्ग कोपला. डोळ्यात भरणारी संपूर्ण द्राक्षबाग गारपिटीत भुईसपाट झाली. आता कर्जफेड, लेकींचे कल्याण, वयोवृद्ध सासू-सासऱ्यांचा औषधोपचार कसा करायचा, जगायचे कसे या विंवचनेत तळेगावरोही येथील संगीता सुनील पाटील या शेतकरी महिलेने टाहो फोडला. (Nashik Heavy Rain)

चांदवड तालुक्यातील तळेगावरोही गावात रविवारी (दि.२६) सायंकाळी ४ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट  झाली. त्यात संगीता पाटील यांची चार एकर द्राक्षबाग उद‌्ध्वस्त झाली. दुष्काळी परिस्थितीत द्राक्षबाग जगवायची कशी, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत संगीता पाटील यांनी धीर न सोडता विकत पाणी आणून बहार घेतला होता. उत्तम घड लगडल्याने चांगल्या उत्पन्नाची खात्री असतानाच गारपिटीने रविवारी होत्याचे नव्हते केले.(Nashik Heavy Rain)

डोळ्यादेखत डोलणारी द्राक्षबाग पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या गारपिटीमुळे द्राक्षांचे घडच नाही तर पानही पूर्णतः झडून गेल्याने बाग उघडी पडली. शेतात अक्षरशः द्राक्षांचा खच जमा झाला आहे. न भूतो न भविष्यती असे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक उद‌्ध्वस्त झाला आहे. 

चार एकर द्राक्षबाग विक्रीस आली होती. फळ चांगले असल्याने चांगल्या उत्पन्नाची खात्री होती. त्यातून घेतलेले कर्ज फेडून मुलींचे शिक्षण, लग्न करण्याचा मनोदय होता. या सर्व स्वप्नांवर निसर्गाने वरवंटा फिरवला. आता जीवनाचा प्रश्न उभा ठाकलाय. नुकसान झाल्यावर सगळेच शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. पण उद‌्ध्वस्त झालेला संसार ज्याचा-त्यालाच पुन्हा जिद्दीने सावरावा लागतो.

संगीता सुनील पाटील, नुकसानग्रस्त बागायतदार, तळेगावरोही

हेही वाचा :

Back to top button