Chandrayan 3 : …तर चांद्रयान 3 चे ‘सॉफ्ट लँडिंग’ पुढे ढकलणार; संचालक एम देसाई यांची माहिती | पुढारी

Chandrayan 3 : ...तर चांद्रयान 3 चे 'सॉफ्ट लँडिंग' पुढे ढकलणार; संचालक एम देसाई यांची माहिती

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chandrayan 3 : भारताची चांद्रयान 3 मोहीम ही आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पाडले आहे. 21 ऑगस्टला लँडर मॉड्यूलचे यशस्वी डिबूस्टिंग करण्यात आले. त्यानंतर आता लँडर मॉड्यूल चंद्रापासून अवघ्या 25 किमी लांब आहे. इस्रोने चांद्रयान 3 चे विक्रम लँडर बुधवारी (दि.२३) सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर (Chandrayaan-3 Mission) उतरणार आहे, असे 20 ऑगस्टला सांगितले होते. मात्र, आता इस्रोने या वेळेत बदल होऊ शकतो. असे म्हटले आहे. 23 ऑगस्टला अडथळे आल्यास 27 ऑगस्टला लँडरला चंद्रावर उतरवणार असे इस्रोने म्हटले आहे.

Chandrayan 3 : सॉफ्ट लँडिंगबाबत संचालक एम देसाई काय म्हणाले?

३० किमी उंचीवरून हे वाहन चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे संचालक एम देसाई यांनी सांगितले. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी 2 तास आधी सर्व सूचना लँडिंग मॉड्यूलला पाठवल्या जातील. त्यांनी सांगितले की, यावेळी त्यांना 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान 3 उतरवण्यात कोणतीही अडचण दिसत नाही, त्यामुळे त्याच तारखेला वाहन उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल. 27 ऑगस्टला लँडिंगसाठीही सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

Chandrayan 3 : सुरुवातीला वेग 1.68 किमी प्रति सेकंद असेल

देसाई यांनी सांगितले की 30 किमी उंचीवरून लँडिंग सुरू केल्यानंतर लँडर मॉड्यूलचा लँडिंग वेग 1.68 किमी प्रति सेकंद असेल. हा वेग अतिशय वेगवान मानला जातो. चंद्राचे गुरुत्वाकर्षण देखील लँडरला खाली खेचेल. यामुळे वाहनाच्या थ्रस्टर्सना रेट्रो-फायर होईल (वाहनाला त्याच्या गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने ढकलण्यासाठी). त्यामुळे त्याचा वेग कमी होईल. जसजसे ते चंद्राच्या पृष्ठभागाकडे सरकणार तसतसे, इंजिन थ्रस्टर फायरचा वेग हळूहळू खाली स्पर्श करेपर्यंत जवळजवळ शून्यावर आणेल. यासाठी लँडर मॉड्यूलमध्ये 4 थ्रस्टर इंजिन बसवण्यात आले आहेत.

Chandrayan 3 : …तर यान नवीन ठिकाणी उतरवणार

देसाई यांनी सांगितले की जर चांद्रयान 3 चे लँडिंग 23 ऑगस्टपासून पुढे ढकलून 27 ऑगस्ट रोजी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर लँडरला आधीच निश्चित केलेल्या ठिकाणापासून सुमारे 450 किमी अंतरावर नवीन ठिकाणी उतरवले जाईल.

हे ही वाचा :

Back to top button