नाशिक क्राइम : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

नाशिक क्राइम : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी राजेंद्र सुपेकर (३४, रा. नाईकवाडी, कालिकामाता मंदिरामागे, गंगापूररोड) हे दुचाकीने एबीबी सर्कलकडून महात्मानगरकडे जात होते. महात्मानगरजवळ झालेल्या अपघातात सुपेकर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सुपेकर यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इमारतीवरून पडल्याने कामगार ठार

नाशिक : इमारतीवरून पडल्याने कामगार ठार झाल्याचा प्रकार मुंबई नाका परिसरात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पंढरीनाथ पवार (२५, रा. आयटीआय सिग्नल, सातपूर) हे नवजीवन इमारतीवर बॅनर लावत असताना पाय घसरून ज‌मिनीवर पडले. जखमी अजयला खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांमध्ये आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

पादचारी महिलेची सोनसाखळी खेचली

नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी खेचल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता साहेबराव बुटे (४२, रा. गोकुळ पार्क, पाथर्डी फाटा) ह्या रस्त्याने पायी जात होत्या. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी बुटे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला प्रवाशाचे दागिने लांबविले

नाशिक : रिक्षा प्रवासात महिला प्रवाशाचे बॅगसह दागिने लांबविल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाबाई कचरू सांगळे (५४, रा. रामकृष्ण पार्क, उंटवाडी) ह्या सीबीएस ते उंटवाडी असा प्रवास करत होत्या. रिक्षातील सहप्रवाशांनी सांगळे यांना बोलण्यात गुंतवून ९७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, बँक पासबुक व एटीएम कार्ड बॅगेतून काढून घेतले. या प्रकरणी अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button