जळगाव : बजाज शोरूममधून तब्बल ३० दुचाकींची चोरी | पुढारी

जळगाव : बजाज शोरूममधून तब्बल ३० दुचाकींची चोरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भडगाव शहरातील साई ऑटो बजाज शोरुममध्ये तब्बल ३० दुचाकींची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोरुमधील एका संशयित कामगारास अटक केली असून, त्याने कमी पैश्यात या दुचाकींची विक्री केल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी पथक नियुक्त करुन पाठविले. पोलिसांचे पथक भडगाव येथे पोहचल्यानंतर त्यांनी साई ऑटो बजाज शोरूमच्या मालकाची त्यांच्याकडील स्टॉकबाबत चौकशी केली. स्टॉक मधून २२ लाख ७७ हजार ९८० रुपये किंमतीच्या एकूण १४ पल्सर मोटारसायकल व १६ प्लॅटीना मोटारसायकल असे एकूण ३० मोटारसायकल कमी असल्याबाबत कळविले.

२६ मोटारसायकल घेतल्या ताब्यात…
पोलिसांच्या पथकाने शोरुम मधील स्टाफची विचारपूस केली. त्यानंतर संशयित शोएब खान रऊफ खान (रा. नगरदेवळा ता.पाचोरा) यांची चौकशी केली. त्याने शोरूम मधून साधारण तीन महिन्यापासून वेळोवेळी जशी संधी मिळेल असे १-१ मोटारसायकल बाहेर काढून इतरांना कमी पैश्यात विकत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी विक्री केलेल्या दुचाकीबाबत संबंधित व्यक्तींची माहिती काढून त्यांच्याकडून १९ लाख ५८ लाख १३९ रुपयांच्या ११ पल्सर व १५ प्लॅटीना मोटारसायकल असे एकुण २६ मोटारसायकल ताब्यात घेतल्या आहेत.

या पथकाने केली कारवाई…
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख चाळीसगाव यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक, गणेश वाघमारे, पो.हे. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, जयंत चौधरी, विजय पाटील, राहुल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी, अनिल जाधव, नितीन बावीस्कर, श्रीकृष्ण देशमुख, हेमंत पाटील, राहुल बैसाणे, महेश पाटील या पथकाने यशस्वी कामगिरी बजावली.

हेही वाचा:

Back to top button