चला पर्यटनाला : निसर्गाच्या कुशीत वसलेली अजिंठा लेणी | पुढारी

चला पर्यटनाला : निसर्गाच्या कुशीत वसलेली अजिंठा लेणी

छत्रपती संभाजीनगर; जे. ई. देशकर :  जागतिक वारसा यादीत मानाचे स्थान मिळालेल्या अजिंठा लेणीत जातक कथांच्या माध्यमांतून गौतम बुद्धांच्या जन्मापासून महापरिनिर्वाणापर्यंतच्या विविध प्रसंगांचे वर्णन दडलेले आहे. शेकडो वर्षांपासून आपले सौंदर्य टिकवून असलेली रंगीत चित्रे हे या लेणीचे वैभव. देश-विदेशांतील पर्यटकांची येथे रीघ कायमच असते.

इतिहास संशोधकांनी केलेल्या नोंदींनुसार आपल्याच पूर्वजांनी या लेणी दोन टप्प्यांत कोरल्या. पहिला टप्पा आजपासून 2,103 वर्षांपूर्वी, तर दुसरा सन 1503 ते 1583 या कालखंडात निर्माण करण्यात आला. त्यात बौद्ध पर्वातील प्रार्थनागृहे (चैत्य) आणि सभागृहे (विहार) आहेत. येथे एकूण 29 लेणी असून, त्यांपैकी 4 क्रमांकाची लेणी सर्वात मोठी आहे. त्यात 28 खांब आणि गौतम बुद्धांच्या सहा मोठ्या मूर्ती आहेत. लेणी क्र. 3, 5, 8, 25 या लेणी अपूर्ण आहेत. मात्र, पहिल्या क्रमांकाच्या लेणीतील जातक कथांची चित्रे थक्क करतात आणि हजारो वर्षे टिकतील असे रंग त्या काळात कसे तयार केले असतील, या विचारानेच डोके चक्रावून जाते. भगवान बुद्धांच्या विविध मुद्रा, चक्रपाणी, दरबार द़ृश्य, पक्षी, फुले, फळे यांची छतांवरील चित्रे मंत्रमुग्ध करून सोडतात.

अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये घोषित केली आहे आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसास्थळाचा मान आहे. जून 2013 मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली, त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. अजिंठा लेणीचे पर्यटन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातून आणि जळगाव मार्गानेही पोहोचता येते. मुंबई, दिल्ली व विदेशी पर्यटकांना विमानसेवेसह रेल्वे सेवा उपलब्ध आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नांदेड या भागांतून येणार्‍या पर्यटकांसाठी एसटी महामंडळाच्या व खासगी बसेस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. भुसावळ, जळगाव मार्गे आले तरी रेल्वेची सुविधा उपलब्ध उपलब्ध आहे.

जेवण व राहण्याची सुविधा

या ठिकाणी एमटीडीसीचे फर्दापूर येथे पर्यटक निवास आहे. तसेच लेणीच्या पायथ्याशीही निवास सुविधा आहे. एमटीडीसीच्या निवासस्थानात डबल रूमसाठी दोन ते अडीच हजार रुपये शुल्क, तर खासगी ठिकाणी 400 रुपयांपासून पुढे सुविधा मिळू शकते. लेणीच्या पायथ्याशी एमटीडीसीचे उपाहारगृह आहे. हे सर्व केवळ एक दिवसांच्या पर्यटनाचे नियोजन आहे.

दळणवळण व्यवस्था

छत्रपती संभाजीनगरातून अजिंठ्याला जाण्यासाठी सिल्लोड मार्गे एसटी महामंडळाच्या बस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर खासगी बससह टॅक्सीही उपलब्ध आहेत. बससाठी प्रति प्रवासी 150 रुपये तर टॅक्सीसाठी छोट्या गाडीला तीन ते साडेचार हजार आणि मोठ्या गाडीसाठी सात हजारांपर्यंत पैसे मोजावे लागतात.

इतरही पर्यटन

एका दिवसांत केवळ अजिंठा लेणीचे पर्यटन होते. रात्री लेणी परिसरात स्टार गेजिंगचा अनुभव घेता येतो. दुसर्‍या दिवशी परिसरातच असलेल्या अंकुर किल्ला, अन्वा टेंपल, वेताळवाडीचा किल्ला, तसेच जगप्रसिद्ध रॉबर्ट गिल आणि पारोच्या प्रेमाचे प्रतिक असलेली पारोची कबर व भुसावळ येथे असलेली रॉबर्ट गीलची कबर याचेही पर्यटन करता येते.

असा लागला शोध

या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी वाघूर नदीकिनारी गेल्याने 28 एप्रिल, इ.स. 1819 रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते.

वाकाटक, महायान कालखंड

पुरातत्त्व शास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडांत निर्माण केली गेली. 9, 10, 12, 13 व 15-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावी. या सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप-रूपांत होते. या व्यतिरिक्त 1 ते 29 क्रमांकांची लेणी साधारणतः 800-900 वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावी. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यास बर्‍याचदा ‘वाकाटक लेणी’ असेही संबोधले जाते.

अजिंठ्यात 29 लेणी

अजिंठा लेणीत एकूण 29 लेणी असून, यात लेणी क्र. 1, 2, 16 आणि 17 मध्ये थ्रीडी अनुभव देतील अशा अजरामर पेंटिंग्ज आहेत. लेणी पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांना 600 रुपये व भारतीय पर्यटकांसाठी 40 रुपये शुल्क आहे. लेण्यांची पूर्ण माहिती समजून घेण्यासाठी गाईडची गरज असते. या ठिकाणी 1 ते 5 व्यक्तींच्या गटासाठी 1 हजार 800 रुपये गाईड शुल्क आहे.

नजीकचे रेल्वेस्थानक

छत्रपती संभाजीनगर………….103 किमी
जळगाव…………………….58 किमी
भुसावळ…………………….62 किमी
पर्यटनाची वेळ………………..स.9 ते सायं. 5
लेणी बंद असण्याचा दिवस …… सोमवार

Back to top button