दिल्लीतील शाळेला बॉम्ब असल्याचा ईमेल; शोधपथक घटनास्थळी दाखल | पुढारी

दिल्लीतील शाळेला बॉम्ब असल्याचा ईमेल; शोधपथक घटनास्थळी दाखल

पुढारी ऑनलाईन: दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी भागात असलेल्या दि इंडियन स्कूल कॅम्पसमध्ये बॉम्ब असल्याचा ईमेल आज (दि.१२) सकाळी मिळाला. या ईमेलमुळे संपूर्ण शाळेत खळबळ उडाली आणि शाळा तातडीने मोकळी करून मुलांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान घटनास्थळी बॉम्ब शोध आणि निकामी पथक दखल झाली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीआरटी रोडवर असलेल्या इंडियन स्कूलला आज सकाळी १० वाजून ४९ मिनिटांनी एक ईमेल आला होता. यामध्ये शाळेत बॉम्ब ठेवल्याचे मेलमध्ये लिहिले होते. हा ईमेल मिळताच शाळा प्रशासन घाबरले असून, त्यांनी याची तात्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी शाळा तातडीने रिकामी करून शाळेला सुट्टी घोषित केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस बॉम्ब शोधक व निकामी पथकासह शाळेत पोहोचले असून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकारानंतर शाळेबाहेर गर्दी जमली असून, पोलीस आणि बॉम्ब निकामी पथक शाळेची तपासणी करत आहेत. या घटनेनंतर मुले आणि शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती मिळताच मुलांचे पालकही शाळेत पोहोचले असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. बॉम्ब मिळण्याची धमकी खरी आहे की कोणी अफवा पसरवली आहे, हे तपासानंतरच समोर येईल, असे देखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, याआधीही गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात याच शाळेत बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश आला होता. मात्र झडती घेतल्यानंतर ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते.

हेही वाचा 

Back to top button