प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी चार कबरी कोणाच्या ? जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेण्याचं काम सुरु | पुढारी

प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी चार कबरी कोणाच्या ? जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेण्याचं काम सुरु

पाचगणी : इम्तियाज मुजावर : छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या व इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यालगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. या ठिकाणी अफजलखानाच्या कबरी बरोबर सय्यद बंडा याची देखील कबर शेजारीच होती. मात्र, अनधिकृत बांधकाम पाडत असताना या दोन्ही कबरींच्या काही अंतरावरच आणखी चार कबरी कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत.

यातील एक कबर ही सेवेकऱ्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि दुसरी कबर शिवकालीन नसल्याचे दिसून येत असल्याचे स्थानिक सांगतात. तिसरी कबरीचा दाखला इतिहासकालीन नसल्याचे सांगितले जात आहे. इतर दोन कबरी अलीकडच्या काळातील असल्याचे स्पष्ट होत आहे. तर काही स्थानिक सांगतात एक कबर इतिहासकालीन आहे. अन्य दोन कबरी अलीकडच्या काळातील असल्याचे स्थानिक सांगतात.

अफजलखानाच्या बरोबर लढण्यास एका सरदार आलेला होता. त्याचे नवीन लग्न झाले होते. तो प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये मारला गेला म्हणून त्याच्या कबरीला दुल्हे मियाची कबर, असे म्हटले जाते, असे स्थानिकांनी सांगितले. दुसरी कबर अलीकडच्या काळातील ख्वाजा मिया याची आहे. तो अफजलखान कबरीच्या सेवेसाठी आला होता. त्याचा मृत्यू कबरीची सेवा करताना झाला होता. या कबरीचा मजार म्हणून उल्लेख केला जातो. तर अन्य दोन कबरी अलीकडील काळातील आहेत. या कबरीवर कोणतीही माहिती लिहिलेली नाही.

अफजल खानाच्या कबरी शेजारी आणखी चार कबरी असल्याच्या वृत्ताला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या ? याबाबत सध्या माहिती घेण्याचं काम महसूल विभागाकडून केले जात आहे. या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडावे, अशी मागणी वारंवार शिवप्रेमींकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. दरम्‍यान, प्रशासनाच्या वतीने मोठ्या पोलिस बंदोबस्‍तात या कबरी शेजारील अतिक्रमण हटवण्यात आले आहे.

 

 

Back to top button