मंदिरे दिवाळीपर्यंत बंदच! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत | पुढारी

मंदिरे दिवाळीपर्यंत बंदच! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

जालना; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे बंदच राहतील. कोरोनाचे आकडे कमी झाले तर दसरा, दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे पुन्हा उघडली जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी म्हटले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असे राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आयसीआयसीआय बँकेमार्फत सीएसआर फंडातून जालना जिल्ह्यासाठी दिलेल्या अत्याधुनिक अशा दोन फिरत्या रुग्णालयांचे लोकार्पण  आरोग्यमंत्री यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात करण्यात आले. नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. पण, थिएटर, धार्मिक स्थळे याबाबत निर्णय झाला नाही. सध्या सणांचे दिवस आहेत. दसरा, दिवाळी तोंडावर असून कोरोनाबाधितांचे प्रमाण घटल्यास मंदिरे उघडण्याबाबत निर्णय शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

हा निर्णय टास्क फोर्सशी चर्चा करून घेतला जाईल. आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच याबाबत अधिकार आहेत, अशी स्पष्टोक्ती आरोग्यमंत्री यांनी दिली.

मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेली बलात्काराची घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायद्याचा जरब आवश्यक आहे.

शक्ती कायद्यासंदर्भात यापूर्वी मंत्रिमंडळात चर्चा झाली. त्यात आणखी सुधारणा अपेक्षित असून, लवकरच याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात गृह विभाग आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

पहा व्हिडिओ : कलाकारांच्या घरचा गणपती : चला जाऊया स्वप्निल जोशीच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला

Back to top button