सातारा; पुढारी वृत्तसेवा : जागतिक वारसा स्थळ लाभलेल्या कास पठारावर रानगव्यांचा वावर वाढला आहे. रविवारी पहाटे कास पठारावर रानगव्याचा कळप मुक्तपणे संचार करत होता. रस्त्यावरुनही हा कळप गेला. त्यामुळे वाहनचालकांनाही धडकी भरली. या परिसरात रानगव्यांची दहशत निर्माण झाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ व आंतरराष्ट्रीय जैवविविधता म्हणून कास पठाराची ओळख आहे. कास पठारावर बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, सायाळ, रानगव्यासारख्या अनेक वन्य प्राण्यांचा वावर असतो.
रविवारी पहाटे पठारावर रानगव्यांचा कळप नागरिकांना दिसला. पाठोपाठ आणखी काही रानगवे त्याच्या मागून आले. रानगव्यांचा हा कळप बिनधास्तपणे इकडून -तिकडे फिरकत होता. भर रस्त्यावरुन काहीकाळ त्याचा संचार राहिला. त्यामुळे रस्त्यावरुन जाणारे वाहनचालक जागीच थबकले.
रानगव्यांचा हा कळप काही कालावधीनंतर दाट झाडीत निघून गेला. या पठारावरील घनदाट जंगलात रानगव्यांचे वास्तव्य असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अनेक रानगवे कळपाने भटकत असल्याचे स्थानिकांनी अनेकदा पाहिले आहे. मात्र त्यांची संख्या नक्की किती आहे? याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.
व्हिडिओ