पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू -काश्मीरच्या श्रीनगर मध्ये एका दहशतवाद्याने बाजाराच्या मध्यभागी एका पोलिस कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. श्रीनगरच्या खानयार भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात पोलिस कर्मचारी अर्शीद मीर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, एका दहशतवाद्याने जुन्या श्रीनगर च्या खानयार भागात मागून पोलिस उपनिरीक्षक अर्शीद मीर यांना लक्ष्य केले. समोर आलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी मागून पोलिस कर्मचाऱ्यावर गोळीबार करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी रस्त्यावर असल्याचे दिसून येत आहे. तेवढ्यात मागून एक दहशतवादी येतो आणि पोलिसांवर गोळीबार करतो. काही वेळातच तो घटनास्थळावरून पळून जातो. गोळ्या लागताच पोलिस कर्मचारी रस्त्यावर पडतो. एक माणूस दहशतवाद्याच्या मागे धावतो पण नंतर लगेच येतो आणि पोलिस उपनिरीक्षकाला उचलतो. त्याला मदत करण्यासाठी आणखी एक व्यक्ती पुढे येतो. ते दोघेही उपनिरीक्षकाला रस्त्यावरून उचलतात.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी १.३५ च्या सुमारास दहशतवाद्याने खानयार येथील पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. प्रोबेशनरी उपनिरीक्षक अर्शीद अहमद जखमी झाले. एसकेआयएमएस सौरा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अर्शीद हा कुपवाडा जिल्ह्यातील कुलमुना भागातील रहिवासी होता. त्याला ३ गोळ्या लागल्या. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली, पण त्याला वाचवता आले नाही.
अर्शिद हे मीर खानयार पोलिस ठाण्यात तैनात होते. पोलिस हा परिसर सील करत असून शोधमोहीम राबवत आहेत.
जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून अर्शीदच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला.
"कर्तव्यावर असताना जम्मू -काश्मीरचे पोलिस उपनिरीक्षक अर्शीद मीर यांच्या निधनाबद्दल कळल्यावर खूप दुःख झाले. श्रीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. एक तरुण निघून गेला. त्याच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची हिंमत मिळावी." अस ट्विटमध्ये ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
पीडीपी नेत्या आणि जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही ट्वीट करून शहीद पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली.
"जम्मू -काश्मीरचे पोलिस उपनिरीक्षक अर्शीद अहमद यांचा आज खनयार येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याचे ऐकून दुःख झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. " अस ट्विटमध्ये मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.