आषाढीसाठी सोलापुरातून 260 जादा बस | पुढारी

आषाढीसाठी सोलापुरातून 260 जादा बस

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने सोलापूर विभागातून 6 ते 14 जुलै या कालावधीत 260 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती सोलापूर विभागच्यावतीने देण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऐतिहासिक वारीवर बंदी घालण्यात आली होती. आता मात्र कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे या यंदा वारीत वारकर्‍यांची मोठी गर्दी होणार आहे. पंढरपूरकडे जाणार्‍या वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे 4700 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते.

या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातून देखील पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांची संख्या मोठी असते. गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून एसटी प्रशासनाने तयारी केली आहे. आषाढी वारी निमित्त जादा गाड्या व गाड्यांच्या फेर्‍यात ही वाढ करण्यात आली आहे. 6 जुलै ते 14 जुलै या कालावधीत पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांना एसटी बसची कमतरता भासणार नाही. गेल्या तीन-चार वर्षातील गाड्यांच्या तुलनेत यंदा एसटीकडून 20 टक्के जादा गाड्या सोडण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सोलापूर विभागाकडून आषाढी वारीसाठी एकूण 260 जादा बस गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पंढरपुरामध्ये 4 तात्पुरत्या स्वरूपाचे बसस्थानक उभारण्यात आले आहे.
– परशुराम नकाते, सहायक वाहतूक अधीक्षक, सोलापूर विभाग

बसस्थानक जादा बस फेर्‍या
सोलापूर मध्यवर्ती स्थानक 65 1057

पंढरपूर 13 304
बार्शी 61 842
अक्कलकोट 20 845
करमाळा 20 682
अकलूज 24 497
सांगोला 12 539
कुर्डूवाडी 16 394
मंगळवेढा 29 774

तात्पुरती चार बसस्थानके
भीमा यात्रा बसस्थानक – औरंगाबाद, परभणी, लातूर, उस्मानाबाद, जालना, नांदेड, अमरावती, अकोला, नागपूर, सोलापूर, बीड, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर. चंद्रभागा स्थानक – सातारा, पुणे, रायगड, ठाणे, पालघर. विठ्ठल साखर कारखाना यात्रा बस स्थानक (टेंभुर्णी रोड), नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे. पांडुरंग बसस्थानक (औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगोला रोड). सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी.

Back to top button