मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले तिसरी लाट येणार; तूर्त लोकल नाही | पुढारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले तिसरी लाट येणार; तूर्त लोकल नाही

सांगली : पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल खुली करण्याचा निर्णय लगेच घेणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त सांगलीच्या दौर्‍यात सोमवारी पत्रकारांना सांगितले.

कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने केंद्रानेही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लोकलबद्दल लगेच निर्णय घेता येणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, तिसर्‍या लाटेतही उद्योगधंदे बंद ठेवले जाणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांनी कामाच्या वेळा विभागून घ्याव्या. शक्य असेल तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ करावे.

उद्योगांनी शक्य आहे तिथे कामगारांच्या राहण्याची सोय करण्याबरोबर आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरीत्या उत्पादन कसे घेता येईल याचा विचार करावा. तिसर्‍या लाटेत उद्योग बंद करणार नाही, असेही ठाकरे यांनी निक्षून सांगितले.

कोरोनाच्या ‘पिक पीरियड’मध्ये राज्यात 1300 टन ऑक्सिजन लागतो. आपण उत्पादन करतो त्यापेक्षा 500 टन ऑक्सिजनची जादा गरज लागते. संभाव्य तिसर्‍या लाटेत यापेक्षा जादा ऑक्सिजन लागेल, असा इशारा देत मुख्यमंत्री उद्धव यांनी प्रशासनाला सतर्क केले.

कोरोना परिस्थितीबाबतही ठाकरे म्हणाले, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोना स्थिती गंभीर आहे. सांगली जिल्ह्यात चाचण्या वाढविण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत.

व्यापार्‍यांच्या पोकळ धमक्यांना भीत नाही

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, काही व्यापारी निर्बंध झुगारून बाजारपेठा सुरू करणार असल्याच्या धमक्या देत आहेत. पण अशा पोकळ धमक्यांना मी भीत नाही. कारण व्यापार सुरू होण्यापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.कुणी तसा प्रयत्न केला तर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

ऑगस्टअखेर तिसरी लाट

नागपुर : ऑगस्टअखेरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेले नाही. त्यावर केवळ चर्चा झाली, असे सांगतानाच टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री कोरोना निर्बंध शिथिल करण्यासह एमपीएससी परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेतील,

असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. व्यापार्‍यांच्या भावनाही मुख्यमंत्र्यांच्या कानी घालू, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Back to top button