

पणजी : पुढारी वृत्तसेवा; आशियातील जुलमी सत्तेविरूद्धचा सर्वात पहिला उठाव हा कुंकळ्ळी गोवा येथे १५ जुलै १५८३ रोजी झाला होता. या लढ्यामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन असे एकूण १६ नागरिक हुतात्मा झाले होते. मात्र, हा उठाव अद्याप गोमंतकीयांना माहित नाही किंवा देशात आणि जगालाही माहित नाही. तो सर्वांना माहित व्हावा, यासाठी गोवा सरकार येत्या शैक्षणिक वर्षापासून कुंकळ्ळीच्या या उठावाची माहिती अकरावीच्या पुस्तकात समावेश करणार आहे. तसेच या उठावाला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत केली.
काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांनी आणलेल्या खासगी ठरावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, १९७५ साली पोर्तुगीजांनी जबरदस्तीने धर्मांतरे सुरु केले. त्यानंतर लोकांवर विविध कर लादले. या सर्वांविरुद्ध कुंकळ्ळीच्या नागरिकांनी उठाव केला. हा उठाव आशियातील एखाद्या वसाहती विरुद्धचा तथा अत्याचारी राजवटीविरुध्दचा पहिला उठाव आहे. मात्र याची दखल कोणीही घेतली नाही. आमच्या सरकारने ही दखल घेऊन या उठावाला राष्ट्रीय मेमोरियल वार म्हणून मान्यता दिली. आज दिल्लीतही या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी आज कुंकळ्ळी येथे जाऊन तेथील हुतात्मा स्मारकाला व हुतात्म्यांना वंदन केले. गोवा विधानसभेत आज सर्व सर्व पक्षांच्या आमदाराने या एकूणच घटनेला उजाळा देताना तो उठाव पुस्तकात अभ्यास रुपाने यावा आणि लोकांना, विद्यार्थ्यांना तो कळावा, अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात शक्य त्या सर्व गोष्टी केल्या जातील असे सांगितले.
गोमंतकीयांना व जगाला गोमंतकियांचे हे शौर्य माहित व्हावे, यासाठी येत्या वर्षापासून अकरावीच्या अभ्यासक्रमातही याबाबतची माहिती समाविष्ट केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी घोषित केले.