पुणे : वाल्हे येथील रस्त्यांवर खड्ड्यांमुळे डबकी | पुढारी

पुणे : वाल्हे येथील रस्त्यांवर खड्ड्यांमुळे डबकी

वाल्हे, पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे (ता. पुरंदर) येथून वीर, परिंचे, हरणी, मांडकी, पिंगोरी, कवडेवाडी, आडाचीवाडी तसेच वाल्हे गाव आदी गावांना जोडणार्‍या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाने रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साठून डबकी झाली असून गावांत प्रवेश करताच या दुर्गंधीयुक्त डबक्यांचा सामना करावा लागत आहे.

पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरून, वाल्हे गावामधून, येथील आद्य रामायणकार महर्षि वाल्मीकी ॠषींचे संजीवन समाधी मंदिर, वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, तसेच घोडेउड्डाण मंदिर, वाल्हे येथील श्री भैरवनाथ मंदिर, हरणी येथील महादेव मंदिर, पिंगोरी येथील वाघेश्वरी मंदिर आदी धार्मिक स्थळांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठून राहात आहे. रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, दररोज प्रवाशांना चाचपडत वाट काढावी लागत आहे.

रस्त्याची साईड पट्टीच पूर्णपणे खचल्याने रस्त्याची उंची जमिनीपेक्षा अधिक होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे. शहीद शंकर चौकातील ओढ्यावरील पुलाजवळ खड्डे पडून पाणी साचून राहत आहे. या ठिकाणापासून ते वीर फाटा व मांडकी रोड या ठिकाणच्या रस्त्यावर डांबर व खडी रहिली नसून मोठे खड्डे पडून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.

भुमीपूजन झाले मात्र काम ठप्पच

दरम्यान, मागील वर्षी याच रस्त्यावर पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरून वाल्हे (ता. पुरंदर) गावातून जाणार्‍या मुख्य रस्त्याची बँक ऑफ महाराष्ट्रसमोर दुरवस्था झाली होती. या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी खासदार गिरीश बापट यांच्या गौण खनिज फंडातून दहा लाखांचा निधी मिळाला होता. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम काही प्रमाणात केले होते. मात्र, यानंतर फेब्रुवारी महिन्यात राख ते हरणी – राऊतवाडी फाटा या रस्त्याच्या 15 कोटींच्या कामाचे भूमिपूजन केले होते.

वाल्हे, हरणी, वीर, परिंचे आदी गावांना जोडणार्‍या रस्त्याला निधी मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता. काही महिन्यांपूर्वी वाल्हे- मांडकी, हरणी या रस्त्यांची साफसफाई तसेच साईडची काटेरी झुडपेही काढली होती. त्यामुळे काम सुरू झाले आहे असे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र, मागील चार महिन्यांपासून या रस्त्यावरील खड्डेसुद्धा न भरल्याने नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी होत आहे.

विद्यार्थी, भाविकांची मुख्य रस्त्यावर वर्दळ

या रस्त्याने वाल्हे येथील विविध शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. महर्षि वाल्मीकी ॠषींच्या संजीवन समाधी मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. वीर (ता. पुरंदर) येथे अमावास्येनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावरून प्रवास करतात.

कार्यकारी अभियंत्यांकडून दुरुस्तीचे आश्वासन

सार्वजनिक बांधकाम विभाग, सासवड येथील अधिकारीवर्गाला या रस्त्याच्या कामासंदर्भात संपर्क केला असता अधिकारीवर्ग फोन उचलण्याचे कष्ट घेत नाही. दरम्यान, अजय भोसले, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग, पुणे या अधिकार्‍यांना संपर्क केला असता, त्यांनी तत्काळ दुरुस्ती तसेच योग्य ती उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Back to top button