महाराष्ट्र शाहीर : जयेश खरेला अजय-अतुलनी दिली ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये गाण्याची संधी

अजय-अतुल आणि जयेश खरे
अजय-अतुल आणि जयेश खरे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'महाराष्ट्राचे शाहीर' म्हणून ज्यांची ख्याती होती, त्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर रोजी सुरु झाले. त्यांच्या जीवनावरील 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाबद्दल उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे. आता या चित्रपटात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या जयेश खरे या मुलाला संधी देण्यात आलीय. छोट्या शाहीर साबळेंना आवाज देण्यासाठी निर्माते, संगीतकारांनी जयेशला ही संधी दिलीय.

सोशल मीडियावर चंद्रा या नावाने लोकप्रिय झालेल्या जयेश खरेला करारबद्ध केले आहे. हे गीत आजचे आघाडीचे गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे. हिंदी आणि मराठी चित्रपसृष्टीतील प्रख्यात संगीतकार अजय – अतुल यांनी यशाच्या आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. युट्यूबवरून 'चंद्रा' गाणे गाऊन नेवाशाजवळच्या एका छोट्या गावातील जयेश खरेला अजय-अतुल यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात गायची संधी दिली आहे. त्यामुळे सहावीतील जयेश एका रात्रीत हिरो झाला आहे.

जयेश खरे हा शिर्डीजवळील राहुरीपासून ३० किमीवर असलेल्या एका गावात राहणारा गरीब घरातील मुलगा. त्याच्या खड्या आवाजातील 'चंद्रमुखी' चित्रपटातील 'चंद्रा' हे्‌ गाणे सोशल मीडियावर गाजले. त्याने शाळेच्या गणवेशात गायलेले गाणे सध्या युटयूबवरून उभ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. हे गाणे जेव्हा 'महाराष्ट्र शाहीर'चे संगीतकार अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांनी मनोमन याच्याकडूनच शाहिरांच्या लहानपणीचे गाणे गाऊन घ्यायचे ठरवले. त्याचा शोध घेतला गेला. त्याला मुंबईला आणून एका उत्तम हॉटेलमध्ये आणले. त्याच्याबरोबर अजय-अतुल यांनी दोन दिवस तालीम केली आणि त्याच्या आवाजातील गाणे गाऊन घेतले.

"हे गाणे त्याने बेफाम गायले आहे. अजय-अतुल यांनी त्याच्यावर मेहनत घेऊन त्याच्यातील गुणवत्तेला १००टक्के वाव देत त्याच्याकडून हे गाणे गाऊन घेतले आहे. हे गाणे यशराज स्टुडीओमध्ये ध्वनिमुद्रित केले गेले आहे. या स्टुडिओची भव्यता पाहून हा मुलगा दिपून गेला होता.

शाहिरांच्या लहानपणीच्या गाण्यासाठी गायकाच्या शोधात असतानाच हा व्हायरल झालेला व्हिडिओ त्यांच्यासमोर आला. त्यांनी गुणवत्ता हेरत त्याला परीसस्पर्श केला, असे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे म्हणाले.

जयेश खरे हा अगदीच सर्वसामान्य घरातील सहावीतील मुलगा आहे. त्याचे वडील एका ऑर्केस्ट्रामध्ये कि-बोर्ड वाजवतात. वर्षातील केवळ सहा महिनेच त्यांना ऑर्केस्ट्रामध्ये काम मिळते. मग उर्वरित दिवस शेतमजुरी करून ते घर आणि जयेशच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. जयेश चार वर्षाचा असतानाच त्याच्या गाण्याच्या या अंगाचा शोध त्याच्या वडिलांना लागला आणि त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले. आता मात्र जयेश घराघरात पोहोचला असून 'महाराष्ट्र शाहीर'मधील आपल्या आवाजाने तो लवकरच ग्लॅमरस दुनियेतील आश्वासक चेहरा म्हणून पुढे येणार आहे.

'महाराष्ट्र शाहीर'ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाने अनेक योग जुळवून आणले आहेत. आजोबांवरील चित्रपटाचे दिग्दर्शन नातू करतो आहे, हे चित्रपटसृष्टीतील कदाचित पहिलेच उदाहरण असेल. त्यानंतर आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट या चित्रपटाने प्रस्थापित केला आहे आणि तो म्हणजे शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत शाहिरांची पणती म्हणजे केदारची मुलगी सना दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news