Nashik Navratri festival : नवरात्रोत्सवावर ‘एटीएस’ची नजर | पुढारी

Nashik Navratri festival : नवरात्रोत्सवावर ‘एटीएस’ची नजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (दि.26) उत्साहात सुरुवात झाली आहे. या उत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणेसह दहशतवाद विरोधी पथकही (एटीएस) सतर्क झाले आहे.

यात्रोत्सवासह गर्दी, हॉटेल, लॉजसह विविध ठिकाणी ‘एटीएस’चे लक्ष राहणार आहे. पोलिस अधीक्षकांनी नाशिक ग्रामीणच्या दहशतवादविरोधी पथकाला त्या संदर्भात आदेश दिले आहेत. यासह जिल्ह्यात राज्य राखीव पोलिस दलाची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. यापैकी जिल्ह्यात सप्तशृंगीगड, चांदवडची रेणुकादेवी, येवल्यातील जगदंबादेवी, कसारा घाटातील घाटनदेवी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात यात्रा भरत असते. तसेच निफाड तालुक्यात तीन मंडळांनी आनंदमेळ्याचे आयोजन केले आहे. यासह ओझर, पिंपळगाव बसवंत, निफाड, वावी, सिन्नर, कळवण, अभोणा, देवळा, मनमाड, येवला शहर, सटाणा, मालेगाव छावणी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रावणदहनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी ठाणीनिहाय सर्वांना निर्देश दिले असून, सप्तशृंगीदेवी यात्रोत्सवाच्या संपूर्ण बंदोबस्ताच्या त्या प्रभारी अधिकारी आहेत. तर स्थानिक गुन्हे शाखेला भुरट्या चोरांसह संशयित, फरार व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा माग काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जल्लोषात होणारा नवरात्रोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या यात्रांसह ग्रामीण भागातील हॉटेल, लॉज, ढाबे तपासण्याचे आदेश एटीएसला देण्यात आले आहे.
मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला जात असून, घातपातविरोधी पथक, जलद प्रतिसाद, दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून दर दोन तासांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button