पुणे : कोयत्याच्या धाकाने ट्रकचालकाला लुटले | पुढारी

पुणे : कोयत्याच्या धाकाने ट्रकचालकाला लुटले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: तिघा चोरट्यांनी एका ट्रकचालकाला कोयत्याच्या धाकाने लुटले. रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. त्यांच्यातील एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नितीन सुनील चव्हाण (वय 22, रा. भराडीवस्ती, वैदुवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत राम सुदाम मोहाळे (वय 27, रा. खोकलेवाडी, परभणी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मोहाळे हे ट्रक घेऊन रविवारी मध्यरात्री मंतरवाडी रोडवरून जात होते. त्या वेळी तिघे मोटारसायकलवरून आले. त्यांनी जबरदस्तीने ट्रक थांबविला. त्यांच्यातील दोघे ट्रकवर चढून फिर्यादी यांना मारहाण केली. एकाने कोयता बाहेर काढून ‘पैसे व मोबाईल काढून दे, नाही तर मारून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यांच्याकडील 10 हजार रुपयांची रोकड व मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.

ट्रकचालकाने दिलेल्या वर्णनानुसार हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे व त्यांचे सहकारी मंतरवाडी परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून तिघे जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले. नितीन चव्हाण याच्याकडून पोलिसांनी कोयता व गाडी जप्त केली. न्यायालयाने त्याला 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करीत आहेत.

Back to top button