‘एआय’ चालविणार अमेरिकेची लढाऊ विमाने | पुढारी

‘एआय’ चालविणार अमेरिकेची लढाऊ विमाने

अणुबॉम्ब हे आधुनिक काळातील शस्त्र होते! पण या मान्यतेला तडा देणारे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे आधुनिक तंत्रज्ञान अस्तित्वात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरात अमेरिकेने परंपरागत बाजी मारली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज ‘एफ-16’ जेट लढाऊ विमान अमेरिकेने तयार केले आहे. या विमानात ‘व्हिस्टा’ (व्हेरिएबल इनफ्लाईट सिम्युलेटर टेस्ट एअरक्राफ्ट) या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. नुकत्याच या विमानाच्या चाचण्या अमेरिकेतील एडवर्ड हवाई दलाच्या तळावर झाल्या आहेत. अमेरिकेचे हवाई दल सचिव फ्रँक केंडाल यांच्या देखरेखीखाली या चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत.

‘व्हिस्टा’ काय करू शकते?

स्वतःला वेळोवेळी अद्ययावत करते. डेटा आणि मशिन लर्निंगवर अवलंबून कार्य करते.
हल्ला करण्यासाठी मानवापेक्षा चांगली अचूकता साधते.
‘व्हिस्टा’च्या वापरामुळे एफ-16 हे लढाऊ विमान हाय स्पीडमध्ये असतानादेखील हल्ला आणि बचाव करण्यासाठी लागणार्‍या सर्व क्लिष्ट क्लुप्त्या करू शकते, हे विशेष. सध्या ‘व्हिस्टा’, मानवी पायलटला बदली म्हणून काम करण्याइतपत प्रगत नाही; पण ते त्याला सहायक म्हणून नक्कीच मदत करू शकते. या आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञान तयार करून लढाऊ विमानांसाठी त्याचा वापर करणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. हे तंत्रज्ञान अजून परिपूर्ण नाही; पण अमेरिकेने यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सुसज्ज लढाऊ विमाने बनवून पुढचे पाऊल टाकले आहे.

अमेरिकेचा मानस :

  • 2028 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज
  • 1,000 लढाऊ विमाने बनविणे
  • पुढील 4 वर्षांत अशी लढाऊ विमाने अमेरिकेच्या हवाई दलात सज्ज करणे

स्पर्धक देश यावर मात करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहेत. चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज लढाऊ विमानांची चाचणी घेतल्याचे पुरावे आजमितीला तरी नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि युद्धासाठी त्याचा उपयोग शस्त्र बनवण्याच्या स्पर्धेला नक्कीच चालना देणारा आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्तेला सामोरे जाण्यासाठी जग पूर्णपणे तयार नसले, तरी तंत्रज्ञान यासाठी सज्ज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे बदलत्या विकासाचा केंद्रबिंदू असणार आहे. याचे फायदे-तोटे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय नियमन आणि धोरणांची आखणी करणे काळाची गरज आहे.

Back to top button