Who was Hardeep Singh Nijjar | कोण होता हरदीप सिंग निज्जर? ज्याच्या हत्येमुळे भारत-कॅनडात तणाव | पुढारी

Who was Hardeep Singh Nijjar | कोण होता हरदीप सिंग निज्जर? ज्याच्या हत्येमुळे भारत-कॅनडात तणाव

पुढारी ऑनलाईन : खलिस्तान दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar) याच्या हत्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडामधील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. हरदीप सिंग निज्जर याची १८ जून रोजी कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Prime Minister Justin Trudeau) यांनी केला आहे. दरम्यान, या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येच्या आरोपावरून कॅनडाने १८ सप्टेंबर रोजी एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. दरम्यान, त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर देत भारताने कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी केली. त्यांना पुढील पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. (Who was Hardeep Singh Nijjar)

हरदीप सिंग निज्जर हा बंदी घातलेल्या खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) प्रमुख आणि भारतातील सर्वात वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. हरदीप सिंग निज्जर याची १८ जून रोजी पश्चिम कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सुर्रे येथील गुरुद्वाराबाहेर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

 संबंधित बातम्या 

१० लाख रुपयांचे रोख बक्षीस

हरदीप सिंग निज्जर हा पंजाबमधील जालंधरच्या भारसिंगपूर येथील आहे. तो १९९७ मध्ये कॅनडाला गेला होता. तेथे त्याने प्लंबर म्हणून काम केले. त्यानंतर तो तेथे खलिस्तान समर्थकांच्या कारवायांत सहभागी झाला. त्यानंतर त्यांच्या संपत्ती वाढ झाली. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) त्याला अधिकृतपणे ‘फरारी’ म्हणून घोषित केले होते. ४५ वर्षीय हरदीप सिंग निज्जर याची माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

टार्गेट किलिंगचा आरोप

पंजाबमध्ये टार्गेट किलिंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडात भारताविरोधात होणाऱ्या निदर्शनांत त्याचा हात असल्याचे सांगितले जाते. २०१४ मध्ये दहशतवादी निज्जरने स्वयंघोषित अध्यात्मिक नेता बाबा भनियारा यांच्या हत्येचा कट रचला होता. एनआयएने जाहीर केलेल्या ४० दहशतवाद्यांच्या यादीतही निज्जरचे नाव होते. कॅनडातील ब्रॅम्प्टनमध्ये खलिस्तानच्या बाजूने आणि भारताच्या विरोधात सार्वमत घेण्यातही निज्जरचा सहभाग होता. निज्जर यांच्या विरोधात २३ जानेवारी २०१५5 रोजी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. २०२१ मध्ये भटिंडा येथील भगता भाई लाल यांच्या कार्यालयात झालेल्या डेरा सच्चा सौदाचे अनुयायी मनोहर लाल यांच्या हत्येतही निज्जरचे नाव पुढे आले होते. (Who was Hardeep Singh Nijjar)

‘दहशतवादी’ म्हणून घोषित

त्याला जुलै २०२० मध्ये कठोर बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायद्यांतर्गत ‘दहशतवादी’ म्हणून घोषित करण्यात आले होते. ज्यामुळे सप्टेंबर २०२० मध्ये एनआयएने त्याची देशातील मालमत्ता जप्त केली होती. २०१६ मध्ये त्याच्याविरुद्ध इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

गंभीर बाब म्हणजे खलिस्तान चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती असलेला निज्जर स्वतंत्र शीख राज्यासाठी भारतात अनधिकृत सार्वमत घेण्यात गुंतला होता. भारतातील अधिकार्‍यांनी गेल्या वर्षी निज्जरची माहिती देणाऱ्यासाठी रोख बक्षीस जाहीर केले होते. त्याच्यावर त्यावेळी एका पुजारीवरील कथित हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप होता.

अटक आणि सुटका

दरम्यान, कॅनडातील सुर्रे येथील स्थानिक अधिकाऱ्यांनीही २०१८ मध्ये निज्जरला दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून अटक केली होती आणि त्याला तात्पुरत्या नजरकैदेत ठेवले होते. पण नंतर त्याची सुटका करण्यात आली.

कॅनडामध्ये शीख समुदायाची लोकसंख्या ७ लाख ७० हजार एवढी आहे. ही लोकसंख्या कॅनडातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे २ टक्के आहे.

कॅनडाचा भारतावर गंभीर आरोप

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेच्या आपत्कालीन सत्रात बोलताना सांगितले की, त्यांच्या सरकारवर ब्रिटिश कोलंबियामध्ये जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येशी भारतीय एजंट्सचा संबंध असल्याचा आरोप आहे. त्यांनी भारत सरकारला हे प्रकरण मिटवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी सांगितले की, या प्रकरणी ट्रूडो सरकारने तातडीने कारवाई केली आहे. “आम्ही एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याला कॅनडातून हटवले आहे,” असे त्यांनी संबंधित अधिकाऱ्याचे नाव न घेता सांगितले.

हा तर मुर्खपणा, भारताचे उत्तर

दरम्यान, कॅनडाने खलिस्तानी समर्थक नेत्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा केलेला आरोप मूर्खपणाचा असल्याचे भारताने म्हटले आहे. अशी कारवाई करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या भूमीतून कार्यरत असलेल्या भारतविरोधी घटकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले होते.

या वादामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांना आणखी धक्का बसला आहे. भारताने कॅनडातील शीख फुटीरतावादी कारवायांवर नाराज व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय व्यापार संबंधांना धोका निर्माण झाला आहे. तसेच प्रस्तावित व्यापार करारावरील चर्चा थांबवली आहे.

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सांगितले की, निज्जरच्या हत्येशी भारताच्या सरकारी एजंट्सचा संबंध असल्याच्या आरोपांचा कॅनडा सक्रियपणे तपास करत आहे. कॅनडामधील भारताची परदेशी गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) च्या प्रमुखांची हकालपट्टी केली आहे.

हे ही वाचा :

Back to top button