खलिस्तानवाद्यांचे पद्धतशीर कारस्थान | पुढारी

खलिस्तानवाद्यांचे पद्धतशीर कारस्थान

गेल्या महिन्यात कॅनडात मारला गेलेला दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा बदला म्हणून भारतीय दूतावासाला लक्ष्य केले जात असल्याचा व्हिडीओ खलिस्तान समर्थकांनी जारी केला आहे. अलीकडील काळात कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेतील खलिस्तानवाद्यांकडून ज्याप्रकारे भारतीय दूतावास, हिंदू धार्मिक स्थळांना लक्ष्य केले आहे, ते पाहता हा एक मोठा पद्धतशीर कट असल्याचे दिसते. भारताने याबाबत तीव्र आक्षेप घेत संबंधित देशांना या भारतविरोधी तत्त्वांना रोखण्याबाबत आवाहन केले आहे.
गेल्या काही वर्षांत खलिस्तानवादाचे भूत सातत्याने आणि पुन्हा पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. अलीकडेच कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेतील खलिस्तान समर्थक धर्मांधांकडून ज्याप्रकारे भारतीय दूतावास, हिंदू धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात आहे, ते पाहता हा एक सुनियोजित आंतरराष्ट्रीय कट असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमधील अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावासाला आग लावण्यात आली. खलिस्तान समर्थक संघटनेने याची जबाबदारी घेतली आहे. शीख फॉर जस्टिसचा प्रमुख दहशतवादी पतवंत सिंग पन्नू याने भारतीय दूतावासांना घेराव घालण्याची घोषणा केली होती. गेल्या महिन्यात कॅनडात मारला गेलेला दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा बदला म्हणून भारतीय दूतावासाला लक्ष्य केले जात असल्याचा व्हिडिओ खलिस्तान समर्थकांनी जारी केला आहे. गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये दोन तरुणांनी निज्जरवर गोळ्या झाडल्या होत्या. निज्जरचे नाव एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत होते. खलिस्तानचा प्रचार करणार्‍या गुरपतवंत पन्नूसोबत हरदीपसिंग निज्जर काम करायचा. निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित होता आणि कॅनडातील ‘शीख फॉर जस्टिस’च्या कार्यावर देखरेख करत होता. निज्जरने कॅनडातील भारतीय दूतावासाबाहेरही तिरंग्याचा अपमान केला होता. मार्च महिन्यातही सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासावर हल्ला झाला होता. पंजाबमध्ये ‘वारिस दे पंजाब’चे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर खलिस्तान समर्थक भारतीय दूतावासाबाहेर जमले आणि तोडफोडीनंतर तेथे लावलेला तिरंगा उखडून टाकला होता. एवढेच नाही तर दूतावासाच्या इमारतीबाहेर खलिस्तानचा ध्वजही लावण्यात आला.

कॅनडामध्ये भारतीयांना लक्ष्य करून धमक्या दिल्या जात आहेत. त्याचा भारताने तीव— निषेध केला आहे. अलीकडेच कॅनडामध्ये ‘शीख फॉर जस्टिस’च्या बॅनरखाली काही पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्समध्ये भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि टोरंटोमधील भारताचे राजदूत जनरल अपूर्व श्रीवास्तव यांच्यावर खलिस्तानी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाला खलिस्तानींना जागा देऊ नका, असे ठणकावले आहे. परंतु खलिस्तान समर्थक घटकांशी सामना करण्यात ही सरकारे अद्यापही प्रभावी ठरलेली नाहीत. या सर्व देशांचे भारताशी जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत; पण खलिस्तान समर्थकांच्या कारवायांकडे ही सरकारे दुर्लक्ष करत आली आहेत. या सरकारांचा असा युक्तिवाद आहे की, जोपर्यंत या संघटना शांततेने आंदोलन करत नाहीत आणि कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही. कारण तसे केल्यास ती कारवाई तेथील नागरी हक्कांच्या विरोधात मानली जाईल. पण या संघटना आणि त्यांच्याशी संबंधित लोक अनेकदा सार्वजनिक जागांचा वापर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी करत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे धर्माच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्थेला थेट आव्हान देण्यावर उतरलेले अमृतपाल सिंग. यामुळेच सर्व मित्र देशांच्या सरकारांना या विघातक घटकांना जागा देऊ नका, असे वारंवार सांगत आहे. भारताच्या सार्वभौमत्वाशी आणि एकतेशी, अखंडतेशी संबंधित हा मुद्दा आहे.

पंजाबमध्ये खलिस्तान चळवळीचा कोणताही परिणाम झालेला नाही यात शंका नाही. पण परदेशात आश्रय घेतलेले खलिस्तानी घटक पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचा आणि खलिस्तानी विचारसरणी पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. परदेशात खलिस्तान चळवळीसाठी रक्त सांडल्याचा दावा करणारे केवळ त्यांच्या हिताचे राजकारण करत आहेत. शिखांवर अत्याचार होत असल्याचा भ्रामक प्रचार करून शीख समुदायाची दिशाभूल केली जात आहे. गेल्या महिन्यातच खलिस्तान समर्थक अवतार सिंग खांडा याचा इंग्लंडमध्ये मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था कट्टरपंथीय घटकांचा वापर करून झाल्यानंतर एक तर त्यांचा नाश करते किंवा त्यांना भूमिगत करते, हे कुणापासून लपून राहिलेले नाही.

अतिरेकी प्रचार, आर्थिक निधीचा गैरवापर आणि पाश्चिमात्य लोकशाही देशांना अड्डे बनवून, हिंसक कारवाया तीव— करून पंजाबमध्ये राष्ट्रविरोधी द्वेषाची आग पुन्हा पेटवण्याचे हे खलिस्तानवाद्यांचे षड्यंत्र आहे. या सर्वांचे मूळ पाकिस्तानातच आहे. 2019 मध्ये भारत सरकारने काश्मीरमधून कलम 370 हटवले, तेव्हापासून पाकिस्तान संतापला आहे. त्यांनी पुन्हा नव्या रणनीतीने काश्मीर धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. सध्या पाकिस्तान पंजाबमध्ये ड्रोनद्वारे ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत असून तीच शस्त्रे नंतर काश्मीरमध्ये येत असल्याचे दिसून आले आहे. ब्रिटनमध्ये पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान खलिस्तानी सार्वमताच्या मागणीचे टी शर्ट घालून स्टेडियममध्ये येताना दिसले होते. एक विमानही खलिस्तान्यांनी आणले होते. यावर भारताने तीव— आक्षेप घेतल्यानंतर बि—टिश सरकारने स्टेडियमवर नो फ्लाय झोन घोषित केले आणि अशा लोकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. आयएसआयकडून परदेशी भूमीवर खलिस्तान समर्थक तयार करण्यात येत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी व्होटबँकेसाठी खलिस्तानी घटकांना मोकळे हात दिले आहेत, ही बाब लपून राहिलेली नाही. लंडन आणि अमेरिकेतील गुरुद्वारांमध्ये खलिस्तान समर्थकांकडून भारतातील हिंसक कारवायांसाठी डॉलर्स गोळा केले जातात, असेही दिसून आले आहे.

– हेमंत महाजन, ब्रिगेडिअर (निवृत्त)

Back to top button