कुत्र्यासह समुद्रात ‘ताे’ 3 महिने भरकटला | पुढारी

कुत्र्यासह समुद्रात 'ताे' 3 महिने भरकटला

सिडनी, वृत्तसंस्था : टीम शॅडॉक (51) हा ऑस्ट्रेलियातील सिडनीचा खलाशी त्याचा कुत्रा बेला याच्यासोबत मेक्सिकोहून फ्रेंच पॉलिनेशियाच्या दिशेने पॅसिफिक महासागरातून निघाला. वादळात त्याची बोट अडकली. तब्बल तीन महिने भरकटली… याउपर तो सुदैवाने जिवंत परतलेला आहे.

यादरम्यान मासे खाऊन, पावसाचे पाणी पिऊन तो व त्याचा कुत्राही जगला. मेक्सिकोतील ला पाझ येथून शॅडॉकने सहा हजार कि.मी.चा हा प्रवास सुरू केला होता. आठवडा उलटला आणि समुद्रात वादळ आले. बोटीचे नुकसान झाले. बोटीतील कम्युनिकेशन सिस्टीमही नष्ट झाली. बरेच दिवस तो समुद्रात एखादी बोट दिसेल, वरून एखादे हेलिकॉप्टर येईल म्हणून मदतीची वाट बघत राहिला, पण तसा योग आला नाही.

अखेर दोन महिने उलटल्यानंतर मासेमारी जहाजासह असलेल्या हेलिकॉप्टरमधून शेडॉकची मोडकी बोट सुदैवाने दिसली… बोटीची अवस्था पाहूनच हेलिकॉप्टरमधील पायलटला सारे काही कळाले आणि शॅडॉक वाचला… आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लाईफ ऑफ पाय या चित्रपटातील कथेचा मी अनुभवलेला खराखुरा प्रत्यय काही फारसा चांगला नव्हता, असे शॅडॉक म्हणतो.

Back to top button