इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घालण्याच्या हालचाली | पुढारी

इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घालण्याच्या हालचाली

इस्लामाबाद, वृत्तसेवा : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अवस्था बुडत्याचा पाय आणखी खोलात यासारखी झाली आहे. तोषखानाप्रकरणी त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले अटक वॉरंट रद्द करण्यात आले असले तरी आता त्यांच्या तेहरिक ए इन्साफ पार्टी ऑफ पाकिस्तान या पक्षावर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर न्यायालयाच्या आवारात घातलेल्या गोंधळप्रकरणी इम्रान खान आणि त्यांच्या पक्षातील डझनभर नेत्यांविरुद्ध दहशतवादप्रकरणी नव्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

इस्लामाबाद न्यायालयात हजर राहण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी न्यायालयाबाहेर गोंधळ घातला. अशा परिस्थितीत अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी इम्रान यांना परत जाण्याची परवानगी दिली. तणावपूर्ण वातावरणात सुनावणी घेणे शक्य नसल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

30 मार्च रोजी होणार्‍या पुढील सुनावणीला खान यांना व्यक्तिशः न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.

पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

न्यायालयाच्या आवाराबाहेर इम्रानच्या समर्थकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. त्याचा परिणाम न्यायालयातही जाणवत होता. त्याचवेळी न्यायालयाच्या आवारातील खिडक्यांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे वातावणातील तणाव वाढला. दरम्यान, इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ पार्टी ऑफ पाकिस्तान (पीटीआय) या पक्षावर बंदी घालण्याचे संकेत पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री राणा सनाउल्लाह यांनी एका पत्रकार परिषदेत दिले. ते म्हणाले, आम्ही याविषयी कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. कारण, इम्रान यांच्या पक्षामुळे देशात अस्वस्थता वाढत चालल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आम्ही हा विषय गंभीरपणे घेतला आहे. मात्र, अशी बंदी घालण्याचा अधिकार अंतिमतः न्यायालयालाच आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी केले.

न्यायालयात शनिवारी इम्रान समर्थकांनी प्रचंड गोंधळ घालून न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी इम्रान खान आणि त्यांच्या बारा सहकारी नेत्यांवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button