आजही दगडांची नाणी चलनात असलेले अनोखे बेट | पुढारी

आजही दगडांची नाणी चलनात असलेले अनोखे बेट

लंडन : सध्या जगभरात चलन म्हणून नोटांचा आणि नाण्यांचा वापर केला जातो; पण जगात आजही एक ठिकाण असे आहे जिथे करन्सी म्हणून दगडांचा वापर केला जातो. प्रशांत महासागरातील मायक्रोनेशियामध्ये यप नावाचे एक बेट आहे. इथली लोकसंख्या ११ हजारांच्या आसपास आहे. येथे आजही दगडांचे चलन वापरले जाते आणि ते अनेक वर्षांपासून सुरू आहे.

बहुतांश भागात घनदाट जंगल व दलदल असणाऱ्या या बेटावर जाण्यासाठी दिवसभरात एकच विमान आहे. दगडांचे चलन वापरणे या ठिकाणी कधी सुरू झाले, याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी येथील लोक चारशे किलोमीटर अंतरावरून दगड कापून आणायचे.. या दगडांना राई म्हटले जायचे. याच दगडांचा चलन म्हणून वापर सुरू झाला.

सध्या दैनंदिन देवाण-घेवाणीसाठी याचा वापर केला जात नाही. याचा वापर माफीनामे किंवा लग्नसंबंध मजबूत करण्यासाठी केला जातो. या दगडांच्या नाण्यांचा आकार सात सेंटिमीटर ते ३.७ सेंटिमीटर इतका असतो. ते कोणत्या कामासाठी वापरले जाते किंवा कुणाला दिले जाते, यावरून त्याचे मूल्य ठरते. गत २०० वर्षांपासून नव्या पिढीला या चलनाची माहिती तोंडीच दिली जात आहे. याचा आकारही खूप मोठा असल्याने ती चोरीला जाण्याचीही भीती नाही.

Back to top button