दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर धोकादायक : नरेंद्र मोदी - पुढारी

दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर धोकादायक : नरेंद्र मोदी

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था जे देश एक हत्यार म्हणून दहशतवादाचा वापर करत आहेत, त्यांच्यासाठीही हा दहशतवाद धोकादायक आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या मुद्द्यावर पाकिस्तानला नाव न घेता ठणकावले. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. विस्तारवादी असा उल्लेख करत त्यांनी चीनलाही कानपिचक्या दिल्या.

अफगाणिस्तानातील परिस्थितीचा वापर कुणीही आपल्या देशाच्या हितासाठी करता कामा नये, हेही आम्ही संयुक्त राष्ट्र म्हणून बघायला हवे, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांचा रोख पाकिस्तानकडे होता. चीनचा थेट उल्लेख न करता ते म्हणाले, आमच्या शेजारी देशांचा डोळा अफगाणिस्तानातील खनिज संपत्तीवर आहे. नि:स्वार्थपणे अफगाणिस्तानातील महिलांचे आणि मुलांचे भवितव्य कसे उज्ज्वल होईल, ते पाहायला हवे, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

समुद्र सर्वांचा

पृथ्वीवर समुद्र हे सर्व देशांचे आहेत. विस्तारवाद आणि ताकदीच्या बळावर कुणी समुद्रावरही कब्जा जमवू बघत असेल, तर असे हेतू आम्ही मिळून उधळून लावले पाहिजेत. (हिंद-प्रशांत सागरी क्षेत्रात चीन विस्तारवादी धोरणाचा अवलंब करत आहे.) सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष म्हणून भारताने यासाठी घेतलेला पुढाकार भारताची विशुद्ध भावनाच अधोरेखित करतो, असा उल्लेखही मोदींनी आवर्जून केला.

संयुक्त राष्ट्रांत सुधारणांची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेलाही आता स्वत:मध्ये योग्य ते बदल घडवून आणावे लागणार आहेत. अनेक प्रश्न जगासमोर उभे राहत आहेत. कोरोना, दहशतवाद आणि अफगाणिस्तानातील संकटाच्या काळात हे प्रश्न आम्हीच गंभीर करून ठेवलेले आहेत.

संयुक्त राष्ट्र म्हणून प्रत्येक प्रश्नाला ठोस उत्तर आमच्याकडे असायला हवे आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघटनेत काही सुधारणा आवश्यक आहेत, असे आग्रही प्रतिपादन मोदी यांनी केले.

महासभेचे अध्यक्षपद भूषवीत असलेले मालदिवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांचे अभिनंदन मोदींनी केले. अब्दुल्लाजींचे अध्यक्षपद ही विकसनशील देशांसाठी अभिमानाची बाब आहे, असा उल्लेख त्यांनी केला. गेल्या दीड वर्षापासून आम्ही शतकातील सर्वात मोठ्या अशा कोरोना महामारीचा सामना करत आहोत. महामारीत जीव गमावलेल्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, अशी सुरुवात मोदींनी केली.

पहिली डीएनए लस भारतात

एकाच दिवसात कोट्यवधी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यासाठी तसेच मर्यादित साधनसामग्रीवर मात करून लस विकसनासाठी भारताने जीवाचे रान केले आहे. भारताने पहिली डीएनए लस विकसित केलेली आहे. आणखी एक आरएनए लस तयार होण्याच्या टप्प्यात आहे.

जगभरातील लस विकसकांना, उत्पादकांना मी भारतात प्लांट उभारून उत्पादन सुरू करण्याचे आमंत्रण या व्यासपीठावरून देत आहे, असे आवाहन मोदींनी केले. कोरोनाने जगाला जागतिक व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्याचा संदेश दिला आहे. आमची ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ या विकेंद्रीकरणातील एका प्रयत्नाचाच भाग आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानवतावादाचा विचार मांडला. विकास सर्वसमावेशक, सर्वव्यापी हवा, हाच अंत्योदय आहे. आम्ही (भारताने) 7 वर्षांत 43 कोटी लोकांना बँकिंगशी जोडलेले आहे. 50 कोटी लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधेच्या कक्षेत आणले आहे. दरम्यान, भारत 75 उपगृह अंतराळात सोडणार आहे, असेही मोदींनी सांगितले.

ड्रोन मॅपिंगच्या माध्यमातून आम्ही लोकांना जमिनीच्या नोंदी उपलब्ध करून देत आहोत. यातून लोकांना बँकांचे कर्ज आणि मालकीही मिळवून देत आहोत. जगातील प्रत्येक सहावा व्यक्ती भारतीय आहे. त्यामुळे भारताचा विकास होतो तेव्हा जगाचाही विकास होत असतो, असा दावा त्यांनी केला.

मोदींसह परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजितसिंग संधू हजर होते.

कोरोनातून सावरल्यानंतर पूर्ववत स्थितीकडे वाटचाल, जलवायू परिवर्तन, लोकांच्या अधिकारांचा सन्मान आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा ही यावेळेच्या महासभेची मध्यवर्ती कल्पना होती.

Back to top button