डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव (मुख्य संपादक, दैनिक पुढारी)
गतवर्षी पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
संपादक, बहार पुरवणी
'…त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले,' असा एक वाक्यप्रचार वापरला जातो. तो 'पुढारी'च्या बाबतीत तंतोतंत प्रत्ययास आला. प्रथम आबांनी 'पुढारी'चा पाया मजबूत केला व त्यानंतर काळाची गरज ओळखून मी अगदी आक्रमक लिखाण, अग्रलेख, आधुनिक मशिनरीपासून बातम्यातील नाविन्य, मांडणीपर्यंत (ले आऊट) 'पुढारी'त आमूलाग्र बदल केले. त्यासाठी अनेकदा वैचारिक पातळीवर आबांशीही दोन हात करावे लागले. तरीही न डगमगता मी निर्णय घेतले. आज 'पुढारी'ची चौफेर झालेली वाढ हे त्याचेच द्योतक आहे. 'पुढारी'चा हा इतिहास रोचक, रंजक असून भावी पिढ्यांसाठी आदर्शवत आहे. कुसुमाग्रज आपल्या कवितेत म्हणतात,
'पदोपदी पसरून निखारे अपुल्याच हाती
होउनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे…'
माझी वाटचाल अशीच होती. तिला परिश्रमाचं कोंदण होतं. ध्येयापर्यंत पोहोचण्याची आस होती व मी पोहोचलोही. 1937 साली जन्मास आलेल्या साप्ताहिकाचे अवघ्या दोन वर्षांतच म्हणजे 1939 साली 'पुढारी' या दैनिकात रूपांतर झाले. कोल्हापूर हे काही महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण नव्हे, ते काहीसे आडबाजूला. तिथंच 'पुढारी'ची मुहूर्तमेढ रोवली गेली, तेव्हा कोल्हापुरात संस्थानी राजवट होती. वृत्तपत्र चालवण्यावर नकळत बंधने होती. अशा काळात वृत्तपत्र चालवणे, त्याचा विस्तार करणे, वाचकप्रिय बनवणे हे काही साधे सोपे नव्हते. आबांनी ती किमया केली. तेव्हाच्या वृत्तपत्रीय पठडीपेक्षा आबांनी 'पुढारी'चे स्वरूप आगळेवेगळे आणि ताजेतवाने बनवले. 'पुढारी' वाचकप्रिय ठरला, एवढेच नव्हे तर 'पुढारी' म्हणजे वृत्तपत्र असे समीकरणच बनले. 'पुढारी' सर्वनामच झाले. आठ दशकांनंतरही हे समीकरण अबाधित आहे.
1980 च्या दशकात 'पुढारी'ची वाटचाल प्रादेशिक वृत्तपत्र बनण्याच्या दिशेनं सुरू झाली. त्या काळात सांगली, सातारा, बेळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पंढरपूर आणि पुणे या भागातही 'पुढारी' पोहोचला होता. पण तो प्रामुख्यानं कोल्हापूरचाच असे. त्यामध्ये त्या त्या जिल्ह्यातील देण्यात येणार्या बातम्यांवर मी समाधानी नव्हतो. मग लवकरच त्या जिल्ह्यांसाठी परिपूर्ण आणि स्वतंत्र आवृत्त्या प्रसिद्ध करण्याचा मी निर्णय घेतला. त्याप्रमाणे 1 एप्रिल 1992 पासून सातारा, कोकण, सोलापूर, बेळगाव, पुणे या स्वतंत्र आवृत्त्या सुरू केल्या.
आबांनी दिलेला पत्रकारितेचा वसा मी पुढे चालवला. मात्र, त्याला व्यावहारिकेची जोड देऊन ते वाढवण्याच्या कामात चिरंजीव योगेशचीही प्रचंड मदत झाली. माझा कारभार म्हणजे एकखांबी तंबू. चि. योगेशमुळे त्याला बलदंड हाताची साथ मिळाली. आज तो दिल्ली, पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी महत्त्वाच्या ठिकाणचा 'पुढारी' सांभाळत आहे. त्यामध्ये वाढ कशी होईल हे पाहात आहे. त्याचबरोबर 'टोमॅटो एफएम', 'पुढारी'च्या वेब आवृत्त्या, यू ट्यूब चॅनेल, 'पुढारी'चे सोशल फाऊंडेशन आदी 'पुढारी'ची महत्त्वाची उपांगे तोच सांभाळत आहे. टोमॅटो एफएम, यू ट्यूब चॅनेल, वेब आवृत्त्या या कल्पनाही त्याच्याच. चि. योगेशमुळे जाधव कुटुंबीयांची नाळ डिजिटल माध्यमांशी जोडली गेली.
चि. योगेश हा धुरंधर नेमबाज; परंतु त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आम्हीच त्याला त्या क्षेत्रापासून परावृत्त केलं. त्यानं 'भारतातील प्रसार माध्यमांपुढील आव्हाने व संधी' या विषयामध्ये पीएच.डी. केली. त्याच्या मीडिया मॅनेजमेंटमधील संशोधनाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते रिसर्च अॅवॉर्डही मिळाले आहे.
चि. योगेशनं आपलं शिक्षण संपल्याबरोबर 'पुढारी'च्या कामकाजात लक्ष घालून महत्त्वाचे प्रकल्प राबवले. चि. योगेशने 'पुढारी'ला व्यावहारिकतेची जोड दिल्याने 'पुढारी'च्या पंखात अधिकच बळ आले. शिवाय 'पुढारी' आर्थिकदृष्ट्या अधिकच सशक्त झाला. मी ध्येयवादी पत्रकारितेचा वसा स्वीकारल्याने तशी ही बाब माझ्याकडून दुर्लक्षितच होती. पण चि. योगेशने नेमके वर्मावर बोट ठेवले. त्याला लेखनाची आवडही आहे. आता तो 'पुढारी'चा संपादक-संचालक असून 'पुढारी'चा हा वारू जोरदारपणे दौडत आहे. आज जाधव घराण्याची तिसरी पिढी मीडिया क्षेत्रात यशस्वीपणे अग्रेसर आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात 'पुढारी'ची घोडदौड चौटाप सुरू झाली. 21 ऑक्टोबर 2007 पासून पुण्यात प्रिंटिंग सुरू करण्यात आले. 2009 साली मुंबई आवृत्ती धडाक्यात सुरू झाली. 2014 ला नाशिक, 2017 ला औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी या आवृत्त्या सुरू करण्यात आल्या. औरंगाबादमध्ये स्वतंत्र प्रिंटिंग युनिट सुरू करण्यात आलं. या सर्वच आवृत्त्यांना अगदी पहिल्यापासूनच वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष पुरवण्यांसाठी त्या-त्या क्षेत्रातील दिग्गजांची अतिथी संपादक म्हणून निवड करण्यात आली. ज्या त्या विभागातील तज्ज्ञांचे लेख घेऊन ते प्रसिद्ध केले. अतिशय आकर्षक, संग्राह्य आणि संदर्भमूल्य असणार्या या विशेष पुरवण्यांनी वाचकांची मनं जिंकली. पुणे शुभारंभाच्या पुरवण्या तर एवढ्या दर्जेदार झाल्या, की पुणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या पुरवण्या ग्रंथरूपानं प्रकाशित कराव्यात, अशी सूचना केली होती.
दैनिक अंकात स्थानिक बातम्यांना म्हणावं तसं ठळक स्थान मिळत नाही. त्यामुळे स्थानिक प्रश्न अपेक्षेप्रमाणं 'हायलाईट' होत नाहीत, हे माझ्या लक्षात आलं. स्वाभाविकच स्थानिक बातम्यांवर अन्याय होतो, हे ध्यानात घेऊन मी स्थानिक बातम्यांसाठी मूळ अंकासोबत चार पानांची स्वतंत्र पुरवणी देण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. मुख्य अंक बारा पानी आणि स्थानिक वृत्त पुरवणी चार पानी अशी ही संकल्पना प्रथम कोल्हापूर व नंतर इतर आवृत्त्यांत राबवण्यात आली.
एकोणीस वर्षांपूर्वी स्वतंत्र पुरवणीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. नंतर या पुरवणीचं नाव 'माय कोल्हापूर' असं करण्यात आलं. 'माय'मध्ये दोन अर्थ लपलेले होते. 'माय' म्हणजे जसं 'माझं' तसेच 'माय' म्हणजे 'माय माऊली' अर्थात आई. या बदलानं वाचकांशी थेट बांधिलकी साधण्यात आम्ही यशस्वी झालो. पुढे मात्र 'पुढारी'नं सुरू केलेल्या या नव्या उपक्रमाचीही इतर वृत्तपत्रांनी अगदी सही सही नक्कल केली! 'पुढारी'नं म्हणजेच मी स्वयंप्रेरणेनं काही नवं सुरू करावं आणि इतरांनी लगेच त्याचं अनुकरण करावं, हा आता पायंडाच पडून गेला आहे.
अभिमानाची गोष्ट म्हणजे 'पुढारी'च्या आता 23 आवृत्त्या असून या सर्व ठिकाणी 'पुढारी' आघाडीवर आहे. त्याचबरोबर उत्तर कर्नाटक आणि गोव्यातही 'पुढारी'चा चांगला खप आणि उत्तम प्रभाव आहे. कोल्हापुरात एमआयडीसी, पुण्यात कात्रज, मुंबईत वाशी येथे, मराठवाड्यासाठी औरंगाबाद एमआयडीसी, गोव्यातील म्हापसा येथे 'पुढारी'च्या आधुनिक प्रिंटिंग प्रेसमध्ये त्या त्या भागातील आवृत्त्यांच्या छपाईचे काम होते. मुंबईत काळबादेवी व सानपाडा येथील भव्य इमारतीतून 'पुढारी'चे कामकाज चालते. नवी दिल्लीसह अन्य राज्यांतही सुसज्ज कार्यालये असून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात प्रशासन यंत्रणेसह वार्ताहरांचंही प्रचंड नेटवर्क विणलेलं आहे. 'पुढारी'चा खप आता सात लाखांहूनही अधिक झालेला आहे. इतरांच्या तुलनेत 'पुढारी'ला सर्वाधिक वाचकवर्ग लाभला आहे.
पूर्वी पुण्या-मुंबईकडून मोठ्या वृत्तपत्रांची कोल्हापूरकडे आक्रमणं व्हायची. मात्र, आता 'पुढारी'नंच कोल्हापुरातून पुण्या-मुंबईकडे मुसंडी मारली! कोल्हापूरसारख्या लहान शहरातून पुण्या-मुंबईवर स्वारी करणारं 'पुढारी' हे एकमेव व पहिलं वृत्तपत्र होय. महानगरात जाऊन राजकारण्यांच्या आणि साखळी वृत्तपत्रांच्या तोडीस तोड कामगिरी 'पुढारी'ने बजावली आणि त्यांना आव्हान निर्माण केलं. त्यातूनच 'पुढारी'च्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी वर्तमानपत्राच्या अंकांच्या किंमतयुद्धानं जन्म घेतला. गेल्या वीस वर्षांपासून हे युद्ध
अखंडपणे सुरू असून, ते आजही थांबलेलं नाही. परंतु 'पुढारी'नं त्यांना अजिबात भीक घातली नाही.
हे किंमतयुद्ध सुरू झालं, तेव्हा खरं तर वृत्तपत्रासाठी लागणार्या न्यूज प्रिंट कागदांच्या किमती भडकलेल्या होत्या. त्यावेळी बारा पानी अंकाचा निव्वळ उत्पादन खर्च हा तीन रुपये असायचा व तेव्हा दैनिकांच्या किमतीही दोन किंवा तीन रुपये असायच्या. आता उत्पादन खर्च सहा रुपयांवर गेला आहे. परंतु, राजकारण्यांच्या आणि भांडवलदारांच्या वृत्तपत्रांनी वेळोवेळी आपल्या अंकाची किंमत अवघी एक रुपया ठेवली. 'पुढारी'नं मात्र किमतीशी फारशी तडजोड न करता दर्जा, गुणवत्ता आणि आक्रमक धोरण यावरच अधिक भर दिला. एक रुपया किंमत लावणार्यांच्या वृत्तपत्रांचा खप तात्पुरत्या स्वरूपात वाढलाही; पण 'पुढारी'वर मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. किंबहुना अंकाच्या दर्जेदारपणामुळे काही ठिकाणी खप अधिकच वाढला.
सध्या भांडवलदार आणि साखळी वृत्तपत्रांनी एक नवाच फंडा चालू केला आहे. 198 रुपयांना वर्षभर अंक आणि तेवढ्याच रकमेची भेटवस्तू! शिवाय एजंटलाही आकर्षक कमिशन! थोडक्यात अंक फुकटच द्यायचा, असा हा 'अव्यापारेषु व्यापार' आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही.
'पुढारी' नावाच्या या विद्यापीठातून म्हणजे माझ्या हाताखाली पत्रकारितेचे धडे गिरवून किती तरी संपादक आणि पत्रकार तयार झाले. किंबहुना आद्य 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्यापासून ती परंपरा आजतागायत अखंड चालूच आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हे दुसर्या महायुद्धाच्या काळात 'पुढारी'चे मुंबईतील प्रतिनिधी होते. "मी 'पुढारी'चा जुना आप्त आहे," असं त्यांनी स्वतःच 'पुढारी'वरील लेखात म्हटलेलं आहे.
शिवाय रमेश मंत्री, इसाक मुजावर, विजय कुवळेकर ही काही पहिल्या टप्प्यातील नावं. शांताराम बोकील, ह. मो. मराठे, श्रीराम पवार अशी कितीतरी नावं या यादीत समाविष्ट करता येतील. 'पुढारी'त तयार झालेले संपादक, कार्यकारी संपादक, निवासी संपादक आजही अनेक दैनिकांतून कार्यरत आहेत. इथले संस्कारच तसे जबरदस्त आहेत.
तयाचा वेलु गेला गगनावेरी
'इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलु गेला गगनावरी'
ज्ञानेश्वरांच्या या ओवीप्रमाणेच 'पुढारी'ची प्रगती दिवसेंदिवस अगदी जोमानं होत गेली. 'निर्णयसागर'च्या दाहक कालखंडानंतर 1981 मध्ये 'पुनश्च हरि ओम' म्हणून 'पुढारी'त पुन्हा मी मनापासून लक्ष घातलं आणि अल्पावधीतच 'पुढारी'नं गरूडझेप घेतली. कोणतेही राजकीय, औद्योगिक आणि आर्थिक पाठबळ नसताना आणि पूर्वपीठिकाही नसताना, आबांनी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाला. बघता बघता 'पुढारी' हे केवळ एक दैनिक न राहता एक लोकविद्यापीठ आणि लोकव्यासपीठ झालं, याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण – "Imagination is the beginning of creation, you imagine what you desire, you will what you imagine and at last you create what you will.'
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे हे चिरंतन विचार माझ्या मनावर कायमचे कोरले गेलेले आहेत. माझ्या यशस्वीतेचं हेच खरं गमक आहे.
'पुढारी'च्या खपावर अन्य साखळी वृत्तपत्रांचा आणि त्यांच्या 'रॅट रेस'चा परिणाम होऊ नये, म्हणून कंबर कसलेली असतानाच आणि 'पुढारी'ची सर्वांगीण प्रगती करण्याचा चंग बांधलेला असतानाच, मी सार्वजनिक कामाकडेही मुळीच दुर्लक्ष केलं नव्हतं. माझ्या द़ृष्टीनं 'पुढारी'ची वाढ जितकी महत्त्वाची होती, तितकेच जनसेवेलाही महत्त्व होतं. कारण या माध्यमातून माझी नाळ जनतेशी, सर्व क्षेत्राशी तसेच समाजातील सर्वच घटकांशी जुळलेलीच राहणार होती.
पत्रकारितेचा वसा मी चालवित असल्याने इथं मराठी वृत्तपत्रांची वाटचाल व त्यामध्ये 'पुढारी'चं झळाळून उठलेलं सुवर्णपान पाहणंही उद्बोधक ठरेल.
एकोणिसावं शतक हे मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या द़ृष्टीने क्रांतिकारक ठरलं. अठराव्या शतकात युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीस सुरुवात झाली व युरोपचा चेहरा-मोहरा बदलून गेला. क्रांतीच्या त्याच ज्वाला जगभर पसरल्या. वर्तमानपत्र हाही त्यामधील एक महत्त्वाचा घटक असून मराठी वृत्तपत्रांचीही देदीप्यमान कारकीर्द आहे.
'मुंबापूर वर्तमान' हे मराठी वृत्तपत्र 20 जुलै 1828 रोजी सुरू झाले. त्यावेळी मुंबईत 'बॉम्बे गॅझेट', 'बॉम्बे कुरियर' यांसारखी इंग्रजी व 'मुंबईना समाचार'सारखे गुजराती वृत्तपत्र प्रकाशित होत होते. अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार मराठी भाषेत पहिले वृत्तपत्र होण्याचा मान 'मुंबापूर वर्तमान'पत्राकडे जातो. (संदर्भ : मराठी विश्वकोश, खंड 12 वा. पान नं. 1543).
आतापर्यंत मराठीतील पहिले वृत्तपत्र म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचे 'दर्पण' गणले जायचेे. 'दर्पण'ने मराठी वृत्तपत्राचा पाया तर घातलाच; परंतु वृत्तपत्रांची थोर परंपराही निर्माण केली. 6 जानेवारी 1832 मध्ये 'दर्पण'ची सुरुवात झाली. हे वृत्तपत्र अल्पायुषी ठरले. अवघ्या साडेआठ वर्षांत म्हणजे 26 जानेवारी 1840 रोजी शेवटचा अंक काढून हे वर्तमानपत्र बंद पडले. त्याकाळात म्हणजे 19 व्या शतकातच 'मुंबई अखबार' (1840) या मराठी वर्तमानपत्राची सुरुवात झाली. त्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे 100 टक्के मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होते. त्यानंतर 'प्रभाकर', 'ज्ञानसिंधू', 'ज्ञानप्रकाश', 'विचारलहरी' आदी काही वृत्तपत्रेही प्रकाशित होऊ लागली. आगरकर-चिपळूणकर व लोकमान्य टिळक यांनी राजकीय गरज लक्षात घेऊन 1881 मध्ये 'केसरी' सुरू केले. पुढे आगरकर यांनी केसरी-मराठा (इंग्रजी)शी संबंध तोडून 'सुधारक'ची सुरुवात केली होती.
स्वातंत्र्यपूर्व काळाचा विचार करता 19 व 20 व्या शतकात कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे 'शालापत्रक'; प्रार्थना समाजचे 'सुबोधपत्रिका'; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'समता', 'मानवता'; ल. ब. भोपटकरांचे 'भाला'; भास्कर जाधवांचे 'कैवारी', महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले 'दीनबंधु' आदी वृत्तपत्रे कार्यरत होती. तर शि. म. पराजंप्यांचे साप्ताहिक 'काळ'; र. धों. कर्वेंचं 'समाजस्वास्थ्य' मासिक; साने गुरुजींचे 'साधना' साप्ताहिक; विठ्ठल रामजी शिंदे यांचे 'उपासना' हे साप्ताहिक; आचार्य विनोबा भावेंचं 'महाराष्ट्र धर्म' हे मासिक अशी अनेक वृत्तपत्रे प्रसारित होत होती. त्या त्या काळात त्यांनी समाजात आपला ठसा उमटवला. एकंदरीतच 1997-98 पर्यंत राज्यात 1561 वृत्तपत्रे प्रकाशित होत होती व त्यामध्ये दैनिकांची संख्या होती 225. यावरून मराठी वृत्तपत्रसृष्टीची वाढ व आवाका आपल्या लक्षात यावा.
विसाव्या शतकात मुंबई मराठी भाषिक प्रांतात अनेक ठिकाणी जिल्हा वृत्तपत्रांचा उदय झाला. मुंबईत त्यावेळी खाडिलकरांचे 'नवाकाळ', आचार्य अत्रेंचा 'मराठा', ठाण्यात बल्लाळांचा 'ठाणे वैभव', पुण्यात नानासाहेब परुळेकरांचा 'सकाळ', लोकमान्य टिळकांचा 'केसरी', अनंतराव पाटील यांचा 'विशाल सह्याद्री', जनसंघाचा 'तरुण भारत', कोल्हापुरात बाळासाहेब पाटील यांचा 'सत्यवादी', ग. गो. जाधव यांचा 'पुढारी', सांगलीत भोसले यांचा 'नवसंदेश', सोलापुरात काडादी यांचा 'संचार', सातार्यात पळणीटकर यांचा 'ऐक्य', नाशिकमध्ये नानासाहेब पोतनीस यांचा 'गावकरी', मराठवाड्यात अनंत भालेरावांचा 'मराठवाडा', विदर्भात अनंत शेवडे यांची 'नागपूर पत्रिका', महाराष्ट्राचे माजी अॅटर्नी जनरल श्रीहरी अणे यांचे वडील कै. बापूजी अणे यांचा 'लोकमत', अकोल्याचे नानासाहेब वैराळे यांचा 'देशोन्नती', बेळगावचे बाबूराव ठाकूर यांचा 'तरुण भारत' अशी अनेक वृत्तपत्रे होती.
यातील काही वृत्तपत्रे ही पुढे जिल्हा वृत्तपत्रे झाली. परंतु संस्थापकांच्या पुढील पिढ्यांकडून या वृत्तपत्रांना सक्षम नेतृत्व न मिळाल्यामुळे यापैकी काही वृत्तपत्रे ही जिल्हा वृत्तपत्रेच राहिली. तर बलदंड वारसा असूनही काही वृत्तपत्रे ही काळानुरूप हळूहळू बंदही पडली. यातील काही वृत्तपत्रे ही संस्थापकांकडूनच इतरांनी विकत घेतली. त्यामध्ये नानासाहेब परुळेकरांचा 'सकाळ' हा शरद पवार कुटुंबीयांनी, बापूजी अणे यांचा 'लोकमत' जवाहरलाल दर्डा, तर नानासाहेब वैराळे यांचा 'देशोन्नती' हा प्रकाश पोहरे यांनी विकत घेतला. पवार, दर्डा, पोहरे कुटुंबीयांनी त्या त्या वृत्तपत्राचा चांगला विस्तार केला हेही नमूद करावे लागेल. तर केसरी, नवाकाळ, गावकरी, संचार, ऐक्य, सत्यवादी, इत्यादी वृत्तपत्रे ही त्या त्या विभागापुरती राहिली किंवा जिल्ह्यांच्या सीमेतच सीमित झाली.
'लोकसत्ता' व 'महाराष्ट्र टाइम्स' यासारख्या भांडवलदारांच्या साखळी वृत्तपत्रांच्या आक्रमणासमोर अनेक जिल्हा वृत्तपत्रांचा निभाव लागला नाही. शिवाय राजकीय व्यक्तींनी विकत घेतलेल्या 'सकाळ', 'लोकमत' या वृत्तपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यांमुळे लहान जिल्हा वृत्तपत्रांना स्पर्धेत टिकता आले नाही. भांडवलदारांचे असो वा साखळी वृत्तपत्र… त्यांनाही आपली स्पेस निर्माण करायची होती व त्याचं आक्रमक रूप म्हणून त्यांनी वाचकाला अल्पशा म्हणजे जवळ जवळ मोफत वार्षिक वाचक वर्गणी स्किम्स दिल्या. त्यामुळे या जीवघेण्या आक्रमक स्पर्धेत छोट्या जिल्हा वृत्तपत्रांना स्पर्धेत टिकून राहणे अवघड झाले. यामुळे अनेक जिल्हा वृत्तपत्रे एक तर बंद झाली किंवा स्पर्धेत मागे पडली.
मी 1969 साली 'पुढारी'ची सूत्रे माझ्या हातात घेतली. त्यावेळी मी माझे वडील ग. गो. जाधव तथा आबांना सांगितले की, आपल्याला स्पर्धेत टिकावयाचे असल्यास काही बदल करून भांडवली वृत्तपत्रांचे आक्रमण थोपवले पाहिजे. परंतु, आबा हे कर्ज घेण्याच्या विरुद्ध होते. त्यामुळे माझे व त्यांचे वैचारिक, व्यावहारिक मतभेद व्हायचे; पण मी त्यांना एखादी व्यावहारिक गोष्ट पटवून दिल्यानंतर ते नाईलाजाने होकार द्यायचे. मी सूत्रे हाती घेताच 'पुढारी'ची आर्थिक कुवत नसताना कर्जाचा प्रचंड डोंगर घेऊन जर्मनीहून नवीन प्रिंटिंग मशिनरी मागवली.
त्यावेळी आबांचे मित्र व 'विशाल सह्याद्री'चे संपादक खासदार अनंतराव पाटील यांनी प्रकर्षाने नवीन कर्ज अंगावर घेऊन वृत्तपत्र चालवण्यास विरोध केला होता. त्यामुळे माझ्यापुढे बर्याच अडचणी उभ्या राहिल्या. शिवाय त्यावेळी बरीच वृत्तपत्रे ही उच्चवर्णीयांच्या हाती होती व 'बहुजन' समाजातील एक तरुण वृत्तपत्र काय चालविणार?' असं म्हणत त्यांनी हाही विषय चेष्टेचा बनवला होता. मी पुण्यात वृत्तपत्रविद्येचे शिक्षण घेतल्यामुळे मला या सर्व गोष्टींची चांगलीच जाण होती. यासाठीच मी शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घेतले.
तरी मी राजाराम कॉलेजमध्ये माझा मुख्य विषय 'मराठी' व 'संस्कृत' ठेवलेला. माझ्या शिक्षणाचा, माझ्या वाचनाचा व माझ्या धाडसी वृत्तीचा निश्चितच मला पुढे फायदा झाला. आज इतर जिल्हा वृत्तपत्रे जरी राज्यपातळीवर अस्तित्वात नसली तरी 'पुढारी'ने मात्र मुंबई, पुण्यातून येणार्या भांडवली वृत्तपत्रांचे आक्रमण तर थोपवलेच; पण उलट मुंबई, पुण्यात आक्रमण करून भांडवली वृत्तपत्रांपुढे आव्हान उभे केले. शिवाय बहुजन समाजातील तरुणही निधड्या छातीने उभा राहतो, वर्तमानपत्र यशस्वीपणे चालवतो, त्याला मानसन्मान मिळवून देतो हेही दाखवून दिलं.
आपण मराठी वृत्तपत्रसृष्टीचा सखोल अभ्यास केला तर हे नमूद करावे लागेल, की संस्थापक पिढीच्या वारसाकडेच असलेले व राज्यभर पसरलेले 'पुढारी' हे एकमेव वृत्तपत्र आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 'पुढारी' हे कोणत्याही भांडवलदाराचे वा राजकीय पुढार्याचे वृत्तपत्र नाही. मी माझ्या वैयक्तिक 75 वर्षांच्या कारकिर्दीत व 'पुढारी'चा कार्यभार सांभाळत असलेल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत कोणत्याही राजकीय पक्षात गेलो नाही किंवा त्यांचे सभासदत्वही घेतले नाही. त्यामुळेच 'पुढारी'ची खर्या अर्थाने नि:पक्ष वृत्तपत्र म्हणून ओळख अबाधित राहिली.
मी आबांची 'ध्येयवादी' पत्रकारिता पुढे सुरू ठेवली. लोकांचे प्रश्न, गरजा लक्षात घेऊन मी संपादक म्हणून काम केले. अशा काही मूलभूत गुणांमुळे 'पुढारी'वर वाचकांचा आजही मोठा विश्वास आहे व तेच 'पुढारी'च्या यशाचे गमकही आहे. येईल त्या संकटाचा विजयी सामना करीत राहिलो. त्यामुळेच 'पुढारी'ची ही यशोपताका फडकताना आज आपल्याला दिसते आहे. हे समाधान अतीव आहे. 'पुढारी' याचा अर्थ लिडर आणि 'पुढारी' हा खरोखरच लिडर आहे हे 'पुढारी'च्या राष्ट्रीय पातळीवर साजर्या झालेल्या सुवर्ण महोत्सव व अमृत महोत्सवाने सिद्ध झालेलं आहे. 'पुढारी'च्या सुवर्ण महोत्सवाला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी, तर 'पुढारी'च्या अमृत महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला दोन पंतप्रधानांनी कोल्हापुरात उपस्थित राहण्याचा बहुमान देशात फक्त आणि फक्त 'पुढारी'लाच मिळाला आहे.
इतकं होऊनही माझे पाय आजही जमिनीवरच आहेत. अहंकाराचा वारा मी माझ्या मनाला कधीही लागू दिला नाही. मी स्वाभिमानी जरूर आहे; पण अहंकारी नाही. परंतु अहंकार आणि स्वाभिमान यांच्यामधली लक्ष्मणरेषा अत्यंत अस्पष्ट असते, याचीही मला जाणीव आहे. म्हणूनच जाणते-अजाणतेपणेही माझ्या पायांनी ती लक्ष्मणरेषा ओलांडू नये, याची मी सदैव दक्षता घेत असतो. त्यासाठी माझं स्वतःचं असं एक 'भरतवाक्य' आहे.
'मी एक पत्रकार आहे.पत्रकारिता हा माझा धर्म आहे. लोकांना सत्य सांगणं हे माझं कर्तव्य आहे. सत्य समजून घेणं, हा लोकांचा अधिकार आहे. माझी बांधिलकी फक्त वाचकांशी आहे. हा मी स्वच्छेनं घेतलेला वसा आहे. उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा मी टाकणार नाही!
॥ तथास्तु ॥'
( sinhayan@pudhari.co.in)