कोल्हापूर : दप्तर भरा… शाळेला चला..! | पुढारी

कोल्हापूर : दप्तर भरा... शाळेला चला..!

कोल्हापूर : प्रवीण मस्के

कोरोनामुळे दीड वर्षापासून बंद असलेल्या माध्यमिक शाळांची घंटा 4 ऑक्टोबरपासून वाजणार असून परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून जाणार आहे. शहर व जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या दोन हजारहून अधिक शाळा ऑफलाईन सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत.

15 जून रोजी शैक्षणिक सत्रारंभ झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक शाळा सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतच्या 112 शाळा असून 50 हजार 718 विद्यार्थी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या 985 शाळा असून सुमारे 4 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत.

शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात तयारी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शाळा परिसर, वर्गखोल्या सॅनिटाईज करणे, पालकांकडून संमतीपत्र घेणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण, शाळा व्यवस्थापन समिती ठराव आदी गोष्टी करण्यास सुरुवात झाली आहे.

शाळा सुरू करताना विद्यार्थी सुरक्षेची खबरदारी व आरोग्यबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.

पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. परंतु पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग गेल्या दीड वर्षापासून सुरू झालेले नाहीत. सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे.

परिणामी पहिलीच्या मुलांची शाळाच सुरू न झाल्याने मुळाक्षरे व अंकज्ञानाची ओळख अद्याप झालेली नाही. मुलांची शाळेविषयी असणारी ओढ कमी झाली आहे. पहिली ते चौथी शिक्षणाचा पाया कुमकुवत झाल्याचे शिक्षक व पालकांचे म्हणणे आहे.

Back to top button