‘या’ शहरात मुक्काम न केल्यास बसतो भुर्दंड! | पुढारी

'या' शहरात मुक्काम न केल्यास बसतो भुर्दंड!

रोम : ‘कालव्यांचे शहर’ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या इटलीतील व्हेनिस शहराची इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. शहराचा मोठा भाग हा पाण्यावरच तयार झालेला आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक इथे येत असतात. मात्र, व्हेनिसविषयी अडचण ही आहे की, यापैकी बहुतांश पर्यटक इथे दिवसभर फिरून निघून जातात. इथे रात्र घालवत नाहीत. त्यामुळे व्हेनिससमोर दोन अडचणी येत आहेत.

एका दिवसात तिथे सरासरी १.२० कोटी पर्यटक येतात; तर ‘पीक सीझन’मध्ये एका दिवसात ३ कोटींपर्यंत पर्यटक येतात. यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर मोठा ताण येतो. दुसरी अडचण ही आहे की, या गर्दीच्या प्रमाणात शहराचे उत्पन्न वाढत नाही. बहुतेक पर्यटक इथे रात्री थांबत नाहीत. त्यामुळे पर्यटनातून कमाईचे मोठे माध्यम मानले जाणाऱ्या हॉटेलांचे मोठे नुकसान होते. आता जानेवारी २०२३ पासून व्हेनिसमध्ये फिरण्यासाठी इटलीने नवा कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार, व्हेनिसला येण्यासाठी पर्यटकांना आधी नोंदणी करावी लागेल. हे नोंदणी शुल्क त्या दिवसातील गर्दीनुसार, २६३ रुपयांपासून ते ८८० रुपयांदरम्यान असेल. इतकेच नव्हे, या नोंदणीच्या वेळेसच पर्यटकाला सांगावे लागेल की, तो रात्री व्हेनिसमध्ये थांबेल की नाही. जर तो रात्री थांबणार नसेल; तर नोंदणीसाठी जास्त शुल्क त्याला द्यावे लागेल!

Back to top button