Cigarette Ban : 2008 नंतर जन्मलेल्या मुलांना धूम्रपानास बंदी! ‘या’ देशाचा मोठा निर्णय | पुढारी

Cigarette Ban : 2008 नंतर जन्मलेल्या मुलांना धूम्रपानास बंदी! ‘या’ देशाचा मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : Cigarette Ban : ‘धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे’ या मुद्यावर लक्ष केंद्रीत करून न्यूझीलंडने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता तरूणांच्या धूम्रपानावर बंदी येणार आहे. याबाबत सरकारने मंगळवारी संसदेत एक कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार 1 जानेवारीपासून 2008 नंतर जन्मलेल्या कुणालाही धूम्रपान संदर्भातील उत्पादने खरेदी करता येणार नाहीत. यामुळे न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेला 26 हजार 400 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. न्यूझीलंडला सिगारेट आणि तंबाखूपासून मुक्त करण्याचे विद्यमान सरकारचे ध्येय असल्याचे त्यांच्या या कृतीवरून स्पष्ट होतंय, असे विश्लेषकांनी मत व्यक्त केले आहे. सरकारच्या मते, पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा हा जगातील पहिला कायदा असेल.

न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्री आयशा वेरल यांनी ‘स्मोक फ्री फ्यूचर’च्या (धूरमुक्त भविष्य) दिशेने एक पाऊल असे म्हणत हे विधेयक संसदेत मांडले. ते म्हणाले- हजारो लोक आता दीर्घ आणि चांगले आयुष्य जगतील. लोकांना धूम्रपानामुळे होणारे आजार होणार नाहीत. यामुळे न्यूझीलंडच्या आरोग्य यंत्रणेचे 26 हजार 400 कोटी रुपये (3.2 यूएस बिलियन डॉलर) वाचतील. (Cigarette Ban New in Zealand)

आयशा वेरल पुढे म्हणाल्या की, “हा कायदा संमत झाल्यानंतर हजारो लोक अधिक काळ आणि निरोगी आयुष्य जगतील. आरोग्य व्यवस्था अधिक चांगली होईल. याचे कारण असं की, धूम्रपानामुळे होणारे आजार जसे की, कर्करोग, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या आजारांवर उपचार करणे खूप महाग आहे. 2023 च्या अखेरीस तंबाखू विक्रीसाठी परवाना असलेल्या किरकोळ विक्रेत्यांची संख्या 6,000 वरून 600 पर्यंत कमी केली जाईल.” असे सांगण्यात आले आहे. न्यूझीलंड 2025 पर्यंत देशाला धूम्रपानमुक्त करण्यासाठी धूम्रपान विरोधी कायदे आणखी कडक करणार आहे. (Cigarette Ban New in Zealand)

भूतानमध्ये 2010 मध्येच सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे न्यूझीलंडमध्ये धूम्रपानविरोधी कडक कायदे असतील असे संकेतही डॉ. वेरल यांनी यावेळी दिले. न्यूझीलंडमधील प्रौढ धूम्रपान करणाऱ्यांची संख्या गेल्या दशकात निम्म्या पटींनी कमी होऊन ही संख्या आठ टक्क्यांवर आली आहे. गेल्या वर्षी 56,000 लोकांनी धूम्रपान सोडल्याचीही माहिती आरोग्य मंत्र्यांनी संसदेत दिली.

देशभरात फक्त 600 दुकानांवर सिगारेट उपलब्ध

धूम्रपानविरोधी विधेयकामुळे सिगारेट विकणाऱ्या दुकानदारांची संख्याही कमी होणार आहे. सध्या सहा हजार दुकानदार सिगारेट विकतात. या विधेयकानंतर केवळ 600 लोकांनाच सिगारेट विकता येणार आहेत. यासोबतच तंबाखूजन्य पदार्थांमधील निकोटीनचे प्रमाण कमी केले जाईल जेणेकरून लोकांना त्याचे व्यसन लागू नये, असेही विधेयकात म्हटले आहे.

ई-सिगारेटवर बंदी नाही

नवीन कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी घालण्यात आलेली नाही. ही सिगारेट तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ई-सिगारेटमध्ये तंबाखूऐवजी लिक्विड निकोटीन असते. ही सिगारेटवर बॅटरीवर चालते आणि चालू केल्यावर, द्रव निकोटीन गरम होते आणि वाफेमध्ये बदलते. म्हणूनच ई-सिगारेट ओढणारे लोक धुराऐवजी बाष्पयुक्त श्वास घेतात. त्यात असलेले द्रव निकोटीन जळत नाही, त्यामुळे धूर येत नाही आणि सिगारेटचा वासही येत नाही. भारतात ई-सिगारेटचे उत्पादन, वितरण, विक्री यावर पूर्ण बंदी आहे.

Back to top button