एलियन यानाचे पुरावे आहेत; पण उघड करणार नाही! अमेरिकन नौदलाच्या माहितीने जगभरात खळबळ | पुढारी

एलियन यानाचे पुरावे आहेत; पण उघड करणार नाही! अमेरिकन नौदलाच्या माहितीने जगभरात खळबळ

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : आमच्याकडे एलियन्सच्या (अन्य ग्रहांवरील जीव) यानांचे (यूएफओ, अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना) पुरावे आहेत. अनेक व्हिडीओ आहेत; पण आम्ही अमेरिकेच्या सुरक्षेच्या कारणास्तव ते सार्वजनिक करू शकत नाहीत. जगाला दाखवू शकत नाहीत, असे खळबळजनक उत्तर माहिती अधिकारांतर्गत प्राप्त झालेल्या एका अर्जावर अमेरिकन नौदलाने दिले आहे.

एलियन यानाचे हे व्हिडीओ जारी केल्याने अमेरिकेला धोका होऊ शकतो. ही रहस्ये अमेरिकेला गुप्तच ठेवायची आहेत. याआधी 2020 मध्ये काही क्लिपिंग आधीच लीक झाल्यामुळे अमेरिकन संरक्षण विभागाने ‘यूएफओ’चे 3 व्हिडीओ जारी केले होते. ‘ब्लॅक वॉल्ट’ या अमेरिकन संकेतस्थळाने माहिती स्वातंत्र्य कायद्यांतर्गत अमेरिकन नौदलाला ‘यूएफओ’चे सगळे व्हिडीओ सार्वजनिक करण्याची विनंती 2 वर्षांपूर्वी केली होती. दोन वर्षांनंतर ही विनंती मान्य करता येणार नाही, असे अमेरिकन नौदलाने आता नमूद केले आहे. हे सारे व्हिडीओ गोपनीय श्रेणीत टाकण्यात आले आहेत, असेही याबाबतच्या उत्तरात नौदलाने नमूद केले आहे.

एलियन यानांचे हे व्हिडीओ आम्ही सार्वजनिक केल्यास काय घडू शकते, त्याची कल्पना करणे या क्षणाला अशक्य आहे. ब्रह्मांडातून हल्लाही होऊ शकतो.
– ग्रेगरी कॅसन, एफओआयए, अमेरिकन नौदल

Back to top button