अमेरिकेतील न्यू जर्सीत घुमतोय ‘मोरया’चा गजर | पुढारी

अमेरिकेतील न्यू जर्सीत घुमतोय ‘मोरया’चा गजर

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : नोकरीनिमित्त सातासमुद्रापार गेल्यानंतरही आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू न देता, मूळचे कागल येथील शंतनू आणि निशिगंधा शिंदे हे दाम्पत्य अमेरिकेत भारतीय सणवार साजरे करत आपल्या संस्कृतीशी इमान राखून आहे. त्यांनी 10 दिवसांकरिता गणरायाची प्रतिष्ठापना केली असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सव केला आहे.

शंतनू व निशिगंधा शिंदे यांचे 12 वर्षांपासून सई आणि सारा या दोन मुलींसह अमेरिकेत वास्तव्य करत आहे. सध्या ते न्यू जर्सी राज्यात हिल्सबोरो गावी राहतात. या दोघांनी अमेरिकेत गेल्यानंतर आपल्या दोन्ही मुलींवर संस्कार होतील, संस्कृतीचे जतन होईल या हेतूने सर्व भारतीय सण, उत्सव साजरे करण्याचे ठरवले. यामध्ये इतर भारतीयांनाही सहभागी करून घेत या उत्सवांची व्याप्‍ती वाढवली. त्यांनीं यंदाही बुधवारी (31 ऑगस्ट रोजी) बाप्पाची शाडूची मूर्ती वाजत गाजत घरी आणून पर्यावरणपूरक आरास, विद्युत रोषणाईसह गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी खास खपली गव्हाची खीर बनवली होती.

गौराईसाठी अळूच्या वड्याही बनवल्या होत्या. सध्या दररोज सकाळ, संध्याकाळी आरती केली जाते. यावेळी महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील मित्र परिवार आरतीस उपस्थित असतो. अनंत चतुर्थीदिवशी गणेशमूर्तीचे घराबाहेर मोठ्या टबमध्ये विसर्जन केले जाते. शाडूची मूर्ती असल्याने सकाळपर्यंत पूर्ण विरघळून जाते. या उत्सवामध्ये दिल्लीचे सुपर्णा आणि रवी जैन, झारखंडमधील दिवा, दित्या आणि नवनीत प्रसाद तसेच उत्तर प्रदेशचे स्वाती, सार्थक, संभव आणि तरुणकुमार हे दहाही दिवस सहभागी होतात.

गुढीपाडव्याला पुरणपोळ्या आणि दसर्‍याला कडाकण्या

महाराष्ट्रात गुढीपाडव्याला घरोघरी पुरणपोळी, आमरस असा खास बेत असतो. शिंदे यांच्या अमेरिकेतील घरातही असाच खास बेत असतो. सकाळी गुढी उभारली जाते, पुरणपोळी केली जाते. तर दसर्‍याला कडाकण्या, करंज्या केल्या जातात. आमचा जो परदेशी मित्र परिवार आहे, त्यांना या पुरणपोळ्या, आमरस आणि कडाकण्याचे फार अप्रूप असल्याचे निशिगंधा शिंदे यांनी सांगितले. हजारो मैलांवर असूनही आम्ही भारतीय असल्याचा अभिमान असून दसरा, दिवाळी, रंगपंचमी, मकर संक्रांत यांसह सर्व सण मित्र परिवार एकत्र येत साजरे करतो.

Back to top button