अफगाणिस्तान आता इस्लामिक अमिरात | पुढारी

अफगाणिस्तान आता इस्लामिक अमिरात

काबूल ; वृत्तसंस्था : चार दिवसांपूर्वी घुसखोरी करून जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा मिळविलेल्या तालिबानने अफगाणिस्तानच्या 102 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत देशाचे नामांतरही करून टाकले. ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ असे नामकरण त्यांनी केले आहे. सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका परिषदेची स्थापना केली जाईल. या परिषदेचे नेतृत्व तालिबानचा सर्वेसर्वा हैबतुल्लाह अखुंदजादा याच्याकडे असेल. ते सुप्रीम लीडर असतील.

इराणच्या धर्तीवर अफगाणिस्तानमध्येही सुप्रीम लीडरचे पद निर्माण करण्यात येत आहे. अखुंदजादा यांच्या मर्जीतील नेत्याकडे हंगामी राष्ट्रपतिपद सोपविले जाणार आहे.

तालिबानचा प्रवक्‍ता जबीउल्लाह मुजाहिद यांनी याबाबतची घोषणा केली. जगातील सर्व देशांबरोबरच चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अफगाणिस्तानात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर तालिबानने धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. देशात कोणतीही लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येणार नाही. कारण या ठिकाणी त्याचे काहीच अस्तित्व नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानात शरियत कायदाच लागू होईल, असे त्यांनी जाहीर केले.

अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला 102 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर तालिबानी नेतृत्वाने ‘इस्लामिक अमिरात’ची घोषणा केली आहे. एका मुलाखतीदरम्यान तालिबान प्रवक्‍ता मुजाहिद म्हणाला की, सर्व देशांशी चांगले राजनैतिक आणि व्यापार संबंध प्रस्थापित व्हावेत, असा आमचा प्रयत्न असून तूर्तास यासंबंधी कोणत्याही देशासोबत अद्याप चर्चा करण्यात आलेली नाही.

इस्लामिक अमिरातच्या स्थापनेनंतर आता देशाचा कारभार हाकण्यासाठी एका परिषदेची स्थापना केली जाईल. त्याचे नेतृत्व हैबतुल्लाह अखुंदजादा करणार असून इराणप्रमाणे अफगाणिस्तानातही सर्वोच्च पद अस्तित्वात येईल, अशी माहिती वरिष्ठ तालिबानी नेता वहिदुल्लाह हाशिमीने दिली. हाशिमीच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानात लोकशाही नसेल. केवळ शरियत कायद्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते.

इस्लामी अमिरात म्हणजे ?

अमिरात शब्द हा अमिरवरून अस्तित्वात आला असून त्याचा अर्थ प्रमुख असा होतो. अमिरअंतर्गत येणारे शहर अथवा देशाला अमिरात म्हटले जाते. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणप्रमाणे आता इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान या नावाने हा देश ओळखला जाईल.

कोण असणार नवा राष्ट्रपती?

दहशतवादी संघटना तालिबानने सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिषद स्थापनेचा निर्णय घेतला आहे. या परिषदेची सर्व सूत्रे अखुंदजादा यांच्याकडे असणार आहेत. या सुप्रीम लीडरच्या मर्जीतील नेत्याला नवा राष्ट्रपती बनविले जाऊ शकते. यासाठी सध्या तीन नावे समोर आली आहेत. पहिले नाव आहे ते तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा मुलगा, दुसरा तालिबानच्या हक्‍कानी नेटवर्कचा ताकदवान नेता सिराउद्दीन हक्‍कानी आणि तिसरे नाव आहे ते अब्दुल गनी बरादर याचे. तो तालिबानचा सहसंस्थापक आहे.

Back to top button