जेरूसलेमचा निर्णय ‘युनो’ने फेटाळला | पुढारी | पुढारी

जेरूसलेमचा निर्णय ‘युनो’ने फेटाळला | पुढारी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

इस्रायलची राजधानी म्हणून जेरूसलेमला मान्यता देण्याचा अमेरिकेचा निर्णय संयुक्‍त राष्ट्रसंघाने फेटाळून लावला. या निर्णयाने सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका एकाकी पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा वादग्रस्त निर्णय घेतला होता.

ट्रम्प यांच्या निर्णयाचे संतप्‍त पडसाद अरब देशांसह अन्य देशांमध्ये उमटले होते. त्यामुळे संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीकडे लक्ष लागून राहिले होते.  सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये ट्रम्प यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्‍त करण्यात आली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी चर्चेने राजधानीच्या मुद्द्यावर तोडगा काढायला हवा, असे मतही यावेळी नोंदविण्यात आले.

ट्रम्प यांच्या निर्णयामुळे मध्यपूर्व देशांत अस्थिरतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे जेरूसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करता येणार नसल्याचा ठरावही या बैठकीत पारित करण्यात आला. दरम्यान, युरोपियन महासंघानेही जेरूसलेम ही इस्रायल आणि  पॅलेस्टाईन या दोन्ही देशांची संयुक्‍त राजधानी असल्याचा दावा केला. अमेरिकेच्या ‘युनो’तील राजदूत निकी हॅली यांनी मात्र ट्रम्प यांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले.

ट्रम्प यांच्या निर्णयाचे संतप्त पडसाद जगभरातील मुस्लिम देशांमध्ये उमटत आहेत. इंडोनेशिया आणि मलेशियासह अनेक देशांमधील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात आली. निदर्शकांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याचे आणि अमेरिकेच्या ध्वजाचे दहन केले. इराणमध्येही हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

Back to top button