चीनने पाकला योग्य समज द्यावी : ट्रम्‍प | पुढारी

चीनने पाकला योग्य समज द्यावी : ट्रम्‍प

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 

दहशतवादी तळांचा खात्मा करण्यासाठी चीनने पाकिस्तानला समज द्यावी, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानची आर्थिक आणि लष्करी नाकेबंदी केल्यानंतर आता अमेरिकेने राजकीय पातळीवरही दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी चीनची मध्यस्थीही अमेरिकेला आवश्यक वाटते. 

अफगाणिस्तानसह या भागात शांततेसाठी पाकने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवणे गरजेचे असून त्यासाठी चीनची मदत घेण्यास आम्ही उत्सुक असल्याचे अमेरिकन अधिकार्‍यांनी म्हटले आहे. पाक आणि चीनचे ऐतिहासिक संबंध असून लष्करी करारदेखील असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. इकॉनॉमिक कॉरिडोरच्या माध्यमातून चीन आणि पाकचे आर्थिक संबंध मजबूत होणार असले तरी दहशतवादाच्या प्रश्‍नाबाबत चीननेही अमेरिकेकडे चिंता व्यक्‍त केल्याची माहिती ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. यासंदर्भात चीन प्रमुख भूमिका बजावू शकते, असेही त्याने म्हटले आहे.

पाकला देण्यात येणारी आर्थिक तसेच लष्करी मदत अमेरिकेने थांबवल्यानंतर चीन आणि पाक यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. पाकने अमेरिकेशी असलेले संबंधही मजबूत करावे, अशी अपेक्षा त्या अधिकार्‍याने व्यक्‍त केली. इकॉनॉमिक कॉरिडोरसाठीही या भागात शांतता असणे आवश्यक असून त्यासाठी तरी चीनने पाकला समज द्यावी, असेही अधिकार्‍याने म्हटले आहे. 

Back to top button