दुसऱ्या शीत युद्धाची नांदी? अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची रशियातून हकालपट्टी | पुढारी

दुसऱ्या शीत युद्धाची नांदी? अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची रशियातून हकालपट्टी

सेंट पिटर्सबर्ग : वृत्तसंस्था

रशिया आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक अधिकाऱ्यांवरील अविश्वासाचा वाद टोकाला पोहोचला आहे. अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांनी रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर आता रशियाने सेंट पिटर्सबर्गमधील अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची तयारी सुरू केली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जे लावरोव यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. रशिया, अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील राजनैतिक अधिकाऱ्यांना हाकलण्याच्या या मालिकेमुळे ही दुसऱ्या शीत युद्धाची नांदी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

अमेरिकेत असलेल्या रशियाच्या ४८ राजनैतिक अधिकाऱ्यांना तसेच संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेवर असलेल्या १२ अधिकाऱ्यांना गेल्या सोमवारी हाकलले आहे. त्यानंतर अमेरिकेची मित्र राष्ट्र असलेल्या कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांच्यासह युरोपमधील काही मित्र राष्ट्रांनी जवळपास ९० रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी रशियाला पाठविले आहे. या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून तेवढ्याच संख्येचे राजनैतिक अधिकारी रशियातून हाकलले जातील, अशी माहिती पराष्ट्रमंत्री लावरोव यांनी दिली. या संदर्भात रशियाच्या परराष्ट्रमंत्रालयाने अमेरिकेचे रशियातील राजदूत जॉन ह्युंस्टमॅन यांना बोलावून घेत त्यांना यासगळ्याची माहिती दिली.

रशिया मॉस्कोमधील अमेरिकेचे ५८ अधिकारी आणि येकाटिरीनबर्ग येथील दोन अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचे रशियाने जाहीर केले आहे. त्यांना येत्या ५ एप्रिलपर्यंत रशिया सोडण्याची मुदत देण्यात आली आहे. तर उद्या  (शनिवार ३१ मार्च) सेंट पिटर्सबर्ग येतील अमेरिकेचे वाणिज्य दुतावास बंद करण्यात येणार आहे. 

काय आहे मूळ प्रकरण?

रशिया आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक अधिकाऱ्यांवरून यापूर्वीही आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. या अधिकाऱ्यांवर हेरगिरी केल्याचा मुख्य आरोप असतो. त्यातच गेल्या १४ मार्च रोजी ब्रिटनने अचानक २३ अधिकाऱ्यांची संशयावरून हकालपट्टी केली. या आरोपांचे रशियाने खंडण केले असून, ब्रिटिश सरकरला याबाबतचे थेट पुरावे सादर करण्याची विनंती केली आहे. मात्र, त्यानंतर अमेरिकेनेही ब्रिटनच्या पावलावर पाऊल टाकत रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखविला आहे. 

अमेरिकेचे म्हणणे काय? 

या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हिथर न्यरेट म्हणाल्या, ‘आम्ही केलेल्या न्याय्य कारवाईवर रशिया अनावश्यक प्रतिक्रिया देत आहे. रशियाच्या प्रतिक्रियेचे कोणत्याही स्थितीत समर्थन करता येत नाही. यावरून रशिया जगातील इतर देशांशी सहकार्य करण्याविषयी गंभीर नसल्याचे दिसत आहे.’

 

Back to top button