योग ही भारताने जगाला दिलेली भेट : PM मोदी | पुढारी

योग ही भारताने जगाला दिलेली भेट : PM मोदी

ब्यूनस आयर्स (अर्जेंटीना) : पुढारी ऑनलाईन

योगासनामुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. हे आपल्या मनावर शांती टिकवून ठेवण्यासाठी ताकद देते. आरोग्य, कल्याण आणि शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदी १३ व्या जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स येथे गेले आहेत. या दरम्यान  ‘शांततेसाठी योग’ (योग फॉर पीस)कार्यक्रमात त्यांनी संबोधित केले. या कार्यक्रमाला ‘शांततेसाठी योग’ असे नाव दिले आहे. मला वाटते की या कार्यक्रमाला यापेक्षा चांगले नाव असू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

जी- २० परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था, शाश्वत विकास, हवामान बदल, फरार आर्थिक गुन्हेगार या मुद्यांवर चर्चा होणार आहे. हे मुद्दे केवळ भारत आणि अर्जेंटिनाच्या नव्हे तर जगाच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, असेही मोदी यांनी नमूद केले.

या परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरेस, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान तंत्रज्ञान, साधनसुविधा, पेट्रोलियम, अन्न सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली आहे.

तसेच पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची त्रिपक्षीय बैठक होणार आहे.

Back to top button