पाकमध्ये शीख मुलीचे अपहरण करून धर्मांतर  | पुढारी

पाकमध्ये शीख मुलीचे अपहरण करून धर्मांतर 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था 

पाकिस्तानात शीख धर्मगुरूंच्या मुलीचे अपहरण करत जबरदस्तीने धर्मांतर करून मुस्लिम तरुणाशी लग्‍न लावल्याचा प्रकार समोर आला आहे. भगवान सिंह असे मुलीच्या वडिलांचे नाव असून मोहम्मद 

एहसान या तरुणाशी जबरदस्तीने तिचे लग्‍न लावून दिले. 

मुलीच्या कुटुंबीयांनी ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करत घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडेही मदत मागितली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा जागतिक स्तरावर न्यावा, अशी विनंती केली आहे. धर्मांतर कर नाहीतर कुटुंबीयांना गोळ्या घालू, अशी धमकी मुलीला दिल्याचा दावा भगवान सिंह यांनी व्हिडीओत केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत ती मुलगी आपण 19 वर्षांची असून स्वेच्छेने निकाह करत असल्याचे म्हटले आहे. मुलीच्या भावाने मात्र तिचे वय 16-17 असल्याचे म्हटले आहे. मुलीचा भाऊ मनमोहनच्या तक्रारीनुसार पोलिसांनी एहसान आणि इतर सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

लाजिरवाणी बाब : कौर

भारतातील केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर म्हणाल्या की, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. पाकिस्तान आतापर्यंत दहशतवादाला आश्रय देत होता. आता गुरूद्वारातून मुली उचलून नेऊन जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, मी इम्रान खान यांना फोनवरून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी त्यांच्या समकक्ष मंत्र्यांशी या मुद्द्यावर चर्चा करावी. 

Back to top button